पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/२५

हे पान प्रमाणित केलेले आहे.
१२
आयुर्वेदांतील मूलतत्वे.

असल्याने त्यांत स्निग्धता आणि शीतता हे गुण उत्पन्न झाले. (शीतपिच्छिलावंबुगुणभूविष्ठी पृथिव्यंबुगुणभूयिष्ठः स्नेहः-शीत आणि विश्छिल हे गुण जलतत्वाच्या आधिक्याने आणि पृथ्वी व अप् दोन यांच्या आधिक्याने स्नेहगुण उत्पन्न होतो, असें सुश्रुतांत लिहिले आहे.) पार्थिवांशामुळेच गुरुता व गुरुत्वामुळे स्थिरता संभवते. मागे सांगितलेंच आहे की तेजाच्या संयोगाने यास चिकटपणा आला असतो व चकाकीलाही कारण तेच आहे. अशा प्रकारे श्लेष्मा म्हणजे एक चिकटविण्याचे सामर्थ्य ज्यांत आहे, अर्थात् चिकट असा पदार्थ आणि त्याचे हे गुण अयथार्थ नाहीत असे दिसून येईल.

_________
श्लेषकत्व किंवा संघटनाची आवश्यकता.


 शरीर म्हणजे काय ? असा प्रश्न केला असता थोडक्यांत उत्तर देता येईल की, हा एक विशिष्ट प्रकारचा पार्थिव परमाणूंचा संघ आहे. हे परमाणु ज्या शक्तीमुळे एकमेकांना चिकटून एकजीव बनले ती श्लेषक शक्ति. श्लेष्मा-अवश्यक आहे हे उघड आहे. आणि शरीराचा अगदी लहानांत लहान असा भाग जरी घेतला तरी त्या भागाचे अस्तित्व हे श्लेषकतेवरच अवलंबून आहे. तिचे अभावीं परमाणु एकमेकांपासून अलग राहतील व मग आकाराचाच अभाव. अशा रीतीने ही शक्ति सर्वत्र असल्याने आयुर्वेदानेंहि श्लेष्मा हा सर्वव्यापि असल्याचे सांगितले आहे, तेहि निराधार ठरत नाही. एकाच शरीराचे निरनिराळ्या अवयवांमध्ये थोडाफार फरक आहेच. शरीराचे काही अवयव कठीण कांहीं मृदू व कांहीं घनस्वरूपाचे तर काही द्रवरूपाचे आहेत. काहींत स्निग्धता पुष्कळ आहे तर काहींत अगदी कमी आहे. आणि या भेदाप्रमाणे त्या त्या शरीरविभागांत कफाचे प्रमाण कमी अधिक आहे. पण शरीरसंघ कायम आहे तोपर्यंत संघस्वरूपाला अवश्यक तो श्लेष्मा सर्वत्र आहे हे सूचित करण्यासाठी दोषांचे स्थूलतया वर्णन करतांना प्राचीन आचर्यांचे 'ते व्यापिनः, दोष हे सर्वत्र व्यापून आहेत - हे तत्व अबाधितच राहते. मात्र याच सूत्रापुढे अपि या विकल्पसूचक अव्ययाची योजना करून स्वास्थ्यसंरक्षण व रोगपरिहार या आयुर्वेदप्रसाराच्या मूलोद्देशाच्या संसिद्धीला ही स्थूल माहिती पुरेशी नसून प्रत्येक दोषाचे सूक्ष्म ज्ञान हेच या कार्याला जरूर पाहिजे. कोणत्या शरीराच्या भागांत कोणत्या दोषाचे किती गुण किती प्रमाणांत आहेत व ते समस्थितीत असतां कोणत्या नैसर्गिक क्रिया सुरळीत राखून आरोग्यसुख देतात, व त्यांत वैगुण्य आले असतां कशा विकृति उपस्थित होतात, या ज्ञानाचे अभावी, निदान व चिकित्सा होत नाही हे स्पष्ट केले आहे.