पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/३१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८
आयुर्वेदातील मूलतत्वें.

पणामुळे विकार उद्भवतात. कोणत्याही कफस्थानाला दूषित करण्याला पचनेंद्रिय म्हणजे आमाशय यांतील कफच कारण आहे. आहाराशिवाय कशाचीच वाढ नाही. यामुळे आमाशयाश्रयी कफलक्षण तृप्ति हे प्रथम सांगितले आहे. भोजनाशिवाय तृप्ति वाटणे म्हणजे खालेल्या पदार्थांचे पचन होत नाही आणि त्यामुळे दुसरा भोजनकाल आला तथापि आमाशय रिकामा नसल्याकारणाने अन्नाची इच्छा होत नाही. आमाशयांत अन्न गेल्यानंतर त्यावर पाचक रसांचा संस्कार होऊन त्याचे सार आणि किट्ट असें पृथक्करण होते. सारभूत रसवाहिनीचे द्वारे धातूंत शोषला जातो. आणि मळाचा उत्सर्ग होतो व आमाशय रिकामा होऊन पुनः अन्नाची मागणी होते. ज्यावेळी नेहमीच्या पचनशक्तीने पचणार नाही असे पदार्थ, अर्थात् जड, शीतल, स्निग्ध भोजनांत येतात अथवा भोजन अधिक होते त्यावेळी योग्य वेळांत पचन होत नाही. अन्नांत पातळपणा उत्पन्न करणारा 'क्लेदक कफ' मागे सांगितला आहे. त्याची यामुळे वाढ होते. आणि आंत पाचक पित्त -हास पावते. या क्रियेला कारण म्हणजे अर्थातच जडत्व आणि शीतत्व ज्यांत अधिक आहे असे पार्थिव आणि आप्य पदार्थ होत. कफामध्ये त्यांचे आधिक्य असते म्हाणून वृद्धिः समानैः सर्वेपाम् ' कोणत्याहि पदार्थाची समानधर्मी पदार्थाने वाढ होते. या सामान्य नियमाला अनुसरून कफाची वाढ होते. आणि त्यामुळे तृप्ति किंवा आहाराविषयी अनिच्छा हे लक्षण उद्भवते. याप्रमाणे या विकाराचे कर्तृत्व कफाकडे येते. कफाचे पूर्वोक्त वास्तवस्वरूप ध्यानी घेतले म्हाणजे हे लक्षण ज्या आमाशयांत उत्पन्न होते, तेथील कफ येवढा अर्थ कळून 'आंतड्यांतील पाचक रसाला जितके पदार्थ सहज पचविता येतील त्याहून ' अधिक जड, शीत असे पदार्थ खाण्यांत आल्याने आमाशयांतील पाचक रसाचे अन्नांत मिश्रण झाले तरी त्याचे प्रमाण कमी पडून योग्य कार्य नियमित वेळांत होत नाही. यामुळे या लक्षणाचा प्रादुर्भाव होतो. याच अर्थाला संक्षिप्तरीत्या सांगणारे, कफने तृप्ती हा विकार संभवतो, हे वाक्य आहे. अशी खात्री होऊन आयुर्वेदीयांनी उगीच काही तरी सांगितले आहे अशाविषयीं त्याबद्दल अनादराला जागा राहणार नाही. मात्र नीट विचार केला पाहिजे. दुसरे लक्षण तंद्रा. तंद्रा म्हणजे निद्रातस्येव यस्येहा तस्य तंद्रां विनिर्दिशेत् ' एकाद्याला झोप आली असतां तो झोंप न घेतां काही काम करीत असतां जसा अर्धवट झोपेत व आळसावलेला दिसतो, त्याप्रमाणे जी विकाराची स्थिति तिला तंद्रा असें म्हणतात. ही कफाने कशी येते ? शरीराचे स्थूल अगर दृश्य भाग ज्याप्रमाणे अन्नरसवाहिनीतून फिरत असतां त्यांतून आपापले घटक निसर्गसामर्थ्याने शोषून घेऊन पुष्ट होतात. त्याचप्रमाणे सूक्ष्म असा शरीरातील भाग ज्ञानतंतु