पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/३२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लो.टिळक ग्रंथसंग्रहालय, वाई


१९
कफाच्या लक्षणांचा खुलासा.

हेहि याच घटकांचा आश्रय करून राहणाऱ्या स्वजातीय सामर्थ्याने वाढतात. ज्ञानेंद्रियांची कार्ये दृश्य नाहीत, तरी कार्यकारी असें सामर्थ्य प्रत्येक अवयवाच्या प्रत्येक घटकाबरोबर असून त्याकडून कार्ये होत असतात. हे सामर्थ्य स्थूल घटकांच्या विशिष्ट संमिश्रणापासून उत्पन्न होत असते. पदार्थाशिवाय सामर्थ्य नाही व सामर्थ्यविहीन पदार्थ नाही. मात्र पदार्थ म्हणजे सामर्थ्य किंवा सामर्थ्य म्हणजे पदार्थ नव्हे. ज्याप्रमाणे गंध हा एकाद्या पदार्थाशिवाय उपलब्ध होऊ शकत नाही, परंतु ज्या पदार्थाच्या आधारावर गंधाचे वास्तव्य आहे तो पदार्थ म्हणजे गंध नव्हे. आणि पदार्थाचा नाश केला तर त्याबरोबर गंधाचाही नाश होतो अशा प्रकारचा गुण आणि गुणी किंवा सामर्थ्य आणि सामर्थ्यवान् यांचा अन्योन्य संबंध आहे. आपल्या शरीराचे अवयव सामर्थ्यवान् आहेत. हे सामर्थ्य ज्ञानतंतूंत आहे. आणि त्यांकडून कार्य घडत असतात. कोणत्याहि अवयवाचे कार्य त्यांतील ज्ञानतंतूंचे सबलतेवर अवलंबून आहे. हे ज्ञानतंतु हीनबल झाले की अवयवाचे आकारमान जरी नीट असते तथापि त्याचे कार्य उत्तम प्रकारे होत नाही. त्याच्या क्रियेत शैथिल्य उत्पन्न होते. शरीराच्या सर्व भागांत-प्रत्येक अवयवांत या ज्ञानतंतूंचे जे सामर्थ्य आहे त्या सर्वांचे केंद्र मेंदु आहे. मागे सांगितले आहेच की मस्तकांतील-मस्तिष्कपिंडांतील-सौम्यता-तर्पक गुण हा इंद्रियांचे ठिकाणी शांतपणा राखीत असतो. याचे प्रमाण वाढले की अर्थातच सर्व इंद्रियांत अधिक शांतता उत्पन्न होते. ही शांतता म्हणजे ज्ञानतंतूंचे तरतरीचा -हास आणि असे झाले म्हणजे अवयवांची कार्यकारी जी शक्ति तींतच मांद्य अथवा शैथिल्य आले म्हणजे कार्यातहि शिथीलता येते. प्रत्येक इंद्रियाचा उत्साह कमी होऊन त्यांत सुस्तपणा येतो. यांत डोळे साफ उघडत नाहीत, मस्तकांतील मस्त पिंड हे मेंदूचे मुख्य स्थान असल्याकारणाने त्याच्या मांद्याचा परिणाम सन्निध असलेल्या नेत्रांवर विशेष होणे अगदी सहज आहे. मागें कफ म्हणजे जे स्निग्धादि गुण सांगितले त्यांत सौम्यता आहे. म्हणजे हा गुण कफ होय. आणि कफानें तंद्रा येते म्हणून सांगतांना तंद्रा ज्यांवर प्रतीत होते अशा ज्ञानतंतूशी ज्याचा संबंध असा तर्पक कफ व तो म्हणजे सौम्यता हे उघड होते. व त्याबरोबरच कफाने उत्पन्न होते असे सांगणे यथार्थ आहे असे कळेल. वर सांगितलेले तंद्रा किंवा सुस्ति हे लक्षण दोन प्रकारांनी अनुभवास येणार आहे. एक सर्वांगीण म्हणजे सर्व शरीर सुस्त होणे आणि दुसरी एकाद्या अवयवावर होणारी. याचे कारण असें आहे की, एकाच शरीराचे निरनिराळे भाग हे ज्याप्रामणे परस्पर विभिन्न आहेत, त्याचप्रमाणे त्या त्या अवयवांना पोषक असणारे पदार्थ हे भिन्न गुणाचे असावे लागतात. आणि आहेत ही. पुष्कळ