पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/३३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०
आयुर्वेदांतील मूलतत्वे.

पदार्थ एकसारखे दिसतात आणि त्यांचे गुणसामर्थ्यांत पुष्कळसें साम्यही पण असते. तथापि थोडासा सूक्ष्म तरी त्यांत फरक हा असावयाचाच असें नसेल तर त्यामध्ये विचित्रता आली नसती. हा जो पदार्थमात्रांत फरक असतो तो कार्यातहि भेद पाडितो व याच परस्परांशी विशिष्टतया प्रतीत होणान्या कार्याला वैद्यशास्त्रांत प्रभाव असें नांव आहे. कोणताहि विकार सर्वांगीण किंवा एक अवयवी होण्याला पदार्थातील हा प्रभावच कारण आहे. असे काही पदार्थ या प्रभावामुळेच शरीरांतील एकाद्या भागांतील कफ वाढवितात व काही असे आहेत की ते सर्व शरीरव्यापी कफाला एक समयावच्छेदाने दूषित करणारे आहेत. व त्यामुळे सर्व शरीरव्यापी व एकावयवव्यापी असे विकार होतात. शरीरामध्ये एकाच जातीचे विकार निरनिराळ्या भागांत होतात. त्याचे कारण हेच होय. उदा० शूल हे लक्षण कोणत्याहि शरीरविभागांत होते. व याला सामान्य कारण वायु आहे. परंतु या वायूनें निरनिराळ्या भागांत शूल उद्भवतात. जर वायु दूषित झाला तर त्याने सर्वत्र शूल कां उत्पन्न करू नये. याचे उत्तर हेच आहे की ज्या भागांत शूल झाला तेथील वायु कुपित झाला आहे. आणि उपचार करतांनाही सामान्य शूलनाशक किंवा वातनाशक असे न करता ज्या भागांतील विकार तन्नाशक असे उपचार करावयाचे. कटिस्थानांत व पृष्ठस्थानी शूल झाला असता इतर शूलनाशक पदार्थांपेक्षा एरंडेलच विशेषतः गुणकारी होते. अशा रीतीने द्रव्यांतरांतील प्रभाव योग्य रीतीने उपयोगांत आणणे हेच चिकित्सेचे रहस्य आहे. अशा प्रकारचा आहार अन्नाशयांत गेला असता त्याचा जो रस तयार होतो त्यांतून प्रत्येक अवयवांत सौम्यता वाढविणारा जो सौम्य गुण त्याची भर पडते आणि ज्या भागांत तो वाढेल तेथील ज्ञानतंतूचे कार्यात शैथिल्य येते. सौम्यता हा गुण कफाचा असल्यामुळे त्याचे वाढीनें उत्पन्न होणारे लक्षण अर्थातच कफाचे ठरत आहे. ज्ञानतंतूमध्येही सौम्यता योग्य प्रमाणांतच असते अशा वेळी त्यांचे पोषण होऊन इंद्रियाचा उत्साह वाढतो आणि ती कार्योत्सुक असतात. अशा रीतीने तंद्रा या लक्षणाचे कर्तृत्व कफाकडे आहे. निद्राधिक्यं च, झोंप अधिक येणे याला कारण वरीलच आहे. ज्या ज्ञानतंतूच्या फाजील सौम्यतेमुळे सुस्ति उत्पन्न होते त्यामुळेच ज्ञानतंतु नियमित वेळांत जागृति देण्यास समर्थ होत नाहीत त्यामुळे झोपेचे प्रमाण वाढते. स्तैमित्यं च-स्तैमित्य म्हणजे एक प्रत्येक अवयवाच्या क्रियेंत मंदपणा येणे आणि दुसरे ‘आर्द्रपटावगुंठनमिव' ओल्या वस्त्राने शरीर गुंडाळल्याप्रमाणे वाटणे असे दोन प्रकार होतील. पैकी, पहिल्या अर्थाचा तंद्रा या लक्षणांतच अन्तर्भाव होतो. दुसरा अर्थ म्हणजे सर्वां‌‌-