पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/३५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२
आयुर्वेदांतील मूलतत्वे.

ठिकाणी वाढलेल्या या पदार्थाचे मिश्रण होऊन त्याची वास्तविक रुचि कळत नाही. कफ हा पदार्थ मधुर रसविशिष्ट असल्याने या अरुचीत गुळचटपणा अगर बेचवपणा येतो. नाही तर सुखमाधुर्य हे इष्ट आहे. दुसरें लक्षण मुखस्राव-तोंडाला पाणी सुटणे, याचे कारण असें आहे की, कफ वाढून तो पच्यमान अवस्थेत येतो. त्यावेळी त्यास खारटपणा येतो. व क्षारत्वामुळे स्त्राव होतो. यावेळी कफाचे पचन करणारी उष्णता जागृत होऊन तिचे मिश्रणानें क्षारत्व येते. विदग्ध अवस्थेत कफाला क्षारत्व येते असा उल्लेख आहे 'विदग्धः क्षारतां ब्रजेत् । उद्गारश्च-ढेकरांचे प्रमाण वाढणे, अन्नाशय आणि फुफ्फुसे ही कफोंने भरली असता श्वासाचे सुखसंचाराला प्रतिबंध येतो. आणि प्राणवायूच्या संचाराला जो अडथळा येतो त्याचे प्रतिलोमगतीचे हे लक्षण आहे. श्लेष्मोद्गिरणं च, म्हणजे कफ मुखावाटें पडणे, याचा विशेष खुलासा करण्याचे कारण नाहीच. मागे कफाच्या उरस्थानाविषयी सांगताना रसपचनाचे कार्य चालू असतां मलरूपी कफ कसा उत्पन्न होतो याचा उल्लेख केला आहे. ज्यावेळी कफकारक म्हणजे पार्थिवाप्य विशिष्ट अशा पदार्थाची आहारांत विशेष भरती होते त्यावेळी अर्थातच स्थूल घटकांचे आधिक्यामुळे उरस्थानांत कफाचा संचय अधिक होतो. व त्याचा मुखावाटें उत्सर्ग होतो.
 'मलस्य आधिक्यं च ' म्हणजे शरीरांतर्गत मळाचे प्रमाण वाढणे. याला कारण वरीलच आहे. प्रथम अन्नाशयांत अन्नाचे पचन होऊन सारभूत रस तयार होतो त्यावेळी पार्थिवांश अधिक असल्यामुळे किट्टमळ-अधिक प्रमाणात निघतो. पुढे असल्याच अन्नरसाचा प्रतिधातूंमध्ये पाक होत असतां देखील मलाचे प्रमाण स्वाभाविकतः ज्यास्त होते. 'कंठोपलेपश्च' म्हणजे कंठाचे ठिकाणी चिकटपणा उत्पन्न होणे. श्वाससंचार आणि अन्नाचा प्रवेश सुखाने व्हावा यासाठी कंठाचे ठिकाणी निसर्गाने जी स्निग्धता ठेविली आहे तिचे प्रमाण कफकारक स्निग्ध पदार्थांनी वाढते व त्यामुळे चिकटपणा येतो.
 'बलासश्च ' म्हणजे कफाचे घट्ट पिंडमयस्वरूपात उत्सर्जन मुखावाटे होणे. (कफाचे बेडके) कफ वाढला असून (छातीमध्ये) उष्णतेमुळे त्यांतील आर्द्रता कमी होते. आणि त्याची अशी स्थिति होते. ह्याचा अनुभव खोकल्यात येतो.
 'हृदयोपलेपश्च' छातीत फुफ्फुसपिंडाचे ठिकाणी चिकटपणा किंवा सारवल्यासारखे वाटणे, छाती भरून येणे. स्निग्ध बुळबुळीतजड अशा कफाची वाढ छातीत झाली असता हे लक्षण सहज होणारे आहे.
 'धमनी प्रतिचयः' शरीरांतील शिरा भरल्याप्रमाणे वाटणे, कफ