पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/३८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२५
श्वास किंवा दमा.


नांवहि या अवस्थेला देणे चुकीचे होणार नाही. तरी पण आयुर्वेदाने रोग नावाने जिला संबोधिले किंवा जी विशिष्टावस्थाच विशेष चिकित्स्य असते ती स्थिति ही नाही. तर याच कफाचे वाढीच्या समीपवर्ति इंद्रियांवर परिणाम होऊन त्यांच्या क्रियांत बिघाड उत्पन्न होतो. व जे श्वास, कास इत्यादि विकार उद्भवतात त्यांना अनुलक्षून सदर संज्ञा योजिली आहे. या अवस्थेमध्ये दोष उन्मार्गगामी असतो. म्हणजें ज्या आशयांत त्याची वाढ झाली त्याचे आसन्नस्थित भागांत त्यामुळे विकृति होते. यापूर्वीचे स्थितीला वाढ किंवा संचय अशी संज्ञा आहे. 'चयो वृद्धिः स्वधाम्न्येव' मात्र हीच उन्मार्गावस्था सर्व विकारांना उत्पादक आहे. प्रस्तुत कफाचे विकार हे कुपितावस्था किंवा उन्मार्गावस्था यांतीलच विचारणीय आहेत. व त्यासाठी कफविकारांतील कांहींचा उल्लेख केला आहे.

__________


श्वास किंवा दमा.


  मुख्य कफस्थान जें उर त्यापासून श्वास या विकाराची उत्पत्ति होते.-या विकारांतील मुख्य कर्तृत्व कफाचे उरस्थानस्थायी अंशाचे वाढीकडे आहे. श्वास किवा दमा हा विकार सर्वविश्रुत आहे. आणि तो कफाने होतो हे सर्वांना माहीत आहे. त्याचप्रमाणे श्वासविकार कशाने होतो? असा प्रश्न केला असतां आयुर्वेदीय चिकित्सकही कफामुळे श्वास होतो हेच उत्तर देणार. पण ह्या उत्तराने प्रागतिक किंवा विवेचक मनाचे समाधान होणार नाही. व म्हणून 'कफाने श्वास' यांतील गर्भितार्थ काय आहे ? इकडे लक्ष्य दिले पाहिजे. पण श्वास हा विकार फुफ्फुस पिंडापासून उद्भवतो. अर्थात् कफाने म्हणजे त्या त्या स्थानांतील कफाने हे उघड आहे. तेथील कफ चिकट बुळबुळीत या स्वरूपाचा पदार्थ असतो. फुफ्फुसांमध्ये या असल्या पदार्थाची अवश्यकता काय हे मागे सांगितलेंच आहे. या तेथील कफाची वृद्धि कफकारक पदार्थानी झाली असतां फुफ्फुसपिंडांतील सूक्ष्म स्रोतसे त्याने भरून जातात. कफाचे वाढीमुळे तेथील पाचकशक्ति हास पावते. आणि वरील स्वरूपाचे पदार्थाचे वाढीबरोबर आर्द्रता वाढते. त्यामुळे त्यांतील घटकामध्ये फुगीरपणा किंवा सूज उत्पन्न होते. व अशा प्रकारें या स्त्रोतसांचा परस्परांवर दाब पडून त्यांतून श्वास वायूचा संचार नीट होत नाही यामुळे श्वासवायु अर्धपथांतून परावृत्त होतो.अर्थात् त्याची ही प्रतिगति विशेष जोराची असते यायोगे श्वसनकिया नाकानेच पुरी न होतां श्वासवायु कदाचित् तोंडानेहि वाहूं लागतो. वायूचे छातीचे भागांत वेदना होतात. अशा रीतीने हा श्वासविकार उत्पन्न

अ...२