पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/३९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
૨૬
आयुर्वेदांतील मूलतत्वे.


होतो. कफाची वाढ हे याला आदिकारण आहे. कफाचा विकार याचा अर्थ कोणत्याही भागांतील कफ असा नाही, तर ज्या इंद्रियावयवावर कफाचा विकार उत्पन्न झाला त्यांत असणाऱ्या कफाची विकृति असा समजावयाचा. प्रत्येक अवयवांत दोषांचे अंश निरनिराळे असतात. याचा उल्लेख मागें केलाच आहे; आणि ज्या आहार्य पदार्थानी शरीरांतील धातूंमध्ये विषमता येते, त्यांचे विविधतेमुळे आणि विचित्र प्रभावामुळे निरनिराळ्यावेळी दोषांचे आणि धातूंचे निराळे अंश दूषित होऊ शकतात. कफकारक या सामान्य गुणाचे पुष्कळ पदार्थ घेतले तर त्यांतून एकादा उरस्थानाश्रयी कफाला दूषित करील. एकादा आमाशस्थ विकृति उत्पन्न करील. एकाद्याने शिरस्थानाश्रित कफाची वाढ होईल. व एकादा असाहि असेल की, त्यामुळे एकसमयावच्छेदानें सर्वांशाने कफाची वाढ होईल. अथवा एकाहून अधिक स्थानांत बिघाड उत्पन्न करूं शकेल. याला कारण, अनंत पदार्थातील वैशिष्टय होय. (याचा विशेष विचार सदर लेखाचे शेवटी रसवीर्यविपाक प्रभाव या प्रकरणांत येईल, तात्पर्य कफाचा विकार म्हणजे तो ज्या स्थानी झाला असेल त्या स्थानांतील दोषगुणाचे वाढीचा हे ध्यानीं ध्यावे लागते. आणि दोष समस्थितीत जें कार्य करीत असतो ते नीट न होणे व समीपवर्ति शरीरविभागावर त्याचा परिणाम है विकाराचे सामान्यतः स्वरूप असते. उरस्थानामध्ये श्वासवायूचे सुखसंचाराला साधनीभूत जो स्निग्ध गुण त्याची वाढ झाली असतां, होणारा विकार प्रथमतः श्वसनक्रियेतच विकृति उत्पन्न करणार. या विकृतीवर उपाययोजनाहि अशीच असते की तीमुळे श्वसनक्रियाच सुधारावी, अर्थात् श्वासनाश हे मुख्य व त्याबरोबर उत्पादक श्लेष्मवृद्धीचा नाश हे दुसरे कार्य, या उपायाचे असते. आयुर्वेदीय चिकित्सक श्वासविकारांत केवळ कफनाशक योजना न करतां, श्वासनाशक म्हणजे श्वासोत्पादक कफनाशक अशीच योजना करतो. अर्थात् ठोकळ त्रिदोषज्ञान चिकित्सेला पुरेसे नाही हे उघड होते. प्रत्येक विकारांत त्यांचा तत्वतः विचार होणे अत्यावश्यक आहे. व यासाठी प्रत्येक विकाराची संप्राप्ति आणि चिकित्सा निराळी सांगण्यात आली आहे. नाहीपेक्षा आयुर्वेदाला 'वस्तिर्विरेको वमनं तथा तैलं घृतं मधु ' येवढीच चिकित्सा तीन दोषांवर सांगून मोकळे होणे अशक्य नव्हते. विकारोत्पादक कारणांप्रमाणेच विकाराविनाशक औषधेहि तशाच विशेष गुणांची आहेत. त्यामुळे केवळ फुफ्फुसपिडांतील श्वासोत्पादक कफाची वाढ व श्वास घालविणारे पदार्थ मिळणे शक्य आहे. आयुर्वेदीय औषधी गुण धर्मशास्त्रांत या विशेष गुणाचा स्पष्टतया उल्लेख केला आहे.


_______________