पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/४

हे पान प्रमाणित केलेले आहे.
आयुर्वेदातील मुलतत्वे
अथवा
"त्रिदोष"
************
निवेदन.


 आयुर्वेद किंवा आर्यवैद्यक हे शास्त्र भरतवर्षात फार प्राचीन काळापासून चालत आलेले असून त्यावर येथील जनतेचा पूर्ण विश्वास होता. व त्याचेच मदतीने आरोग्यरक्षणाचे कार्यहि उत्तम प्रकारें होत होते. परंतु थोड्या काळापूर्वी हिंदुस्थानांत जी एक क्रांती झाली तिचा परिणाम या वैद्यशास्त्रावरहि झाला आणि आयुर्वेदाविषयींचा विश्वास कमी होऊन त्याची मान्यता कमी होता होता " आयुर्वेद हैं शास्त्र आहे की नाही? आयुर्वेदाची रचना उपपत्ति-पूर्ण नाही, तें गृहित सिद्धांतासारखे वाटते" इत्यादि विधाने नव्या मन्वन्तरांतील नव शिक्षितांकडून प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतिने होऊ लागली. राष्ट्राच्या वैभवाचे आणि त्याच्या श्रेष्ठत्वाचे बरोबर संस्कृती आणि शास्त्रीय श्रेष्ठत्व यांचीही विस्मृति पडली म्हणावयास हरकत नाही. सुधारलेल्या राष्ट्राची जी अनेक लक्षणे त्यांत राष्ट्रीय वैद्यकाची श्रेष्ठता हें अवश्य होय. राष्ट्रांतील व्यक्तींच्या वैयक्तिक संपन्नतेला जरूर ते आरोग्य ज्या राष्ट्रांतील वैद्यशास्त्र राखू शकणार नाही, त्या राष्ट्राला स्वावलंबी कसे म्हणता येईल ? आर्यांच्या आर्यावर्तात शास्त्रे, कला इत्यादींची वाढ झाली होती अशी इतिहास साक्ष देतो. पौर्वात्य देशांतील शास्त्रीय प्रगति आणि संस्कृती उच्च दर्जास पोहोचली असल्याविषयी विद्वानांत मतभेद नाही. मग अशा या संपन्न, सुसंस्कृत आणि बुद्धिप्रधान आर्यावर्तात वैद्यशास्त्रासारखें अत्यंत अवश्य आणि उपयुक्त असे शास्त्र मागसलेले असेल अशी कल्पना कशी पटेल, आणि तसा सिद्धांत काही एतद्देशीय आधुनिक विद्वान् प्रस्थापित करीत असतां आश्चर्य का न वाटावें? परंतु आश्चर्य वाटले तरी वस्तुस्थिति ही मात्र अशी खरी. आयुर्वेदाविषयीं अविश्वास उत्पन्न झाला, पाश्चात्य वैद्यकाचा प्रसार सर्वत्र झाला ही गोष्ट खरी आहे. आंग्लाईच्या नवलाइनें जें एक स्थित्यंतर घडून आले किंवा जो एक चमत्कार घडून आला तो हा की शिक्षितांतील स्वाभिमान नष्ट व्हावा; किंबहुना ? स्वत: