पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/४२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२९
राजयक्ष्मा-कफक्षय.


त्याही विकारामध्ये स्थानदुष्टीलाच महत्व असते. ज्या ठिकाणी संग म्हणजे प्रतिबंध त्या ठिकाणी विकारोद्भव असा नियम आहे.

कुपितानां हि दोषाणां शरीरे परिधावतां ॥
यत्र संगः स्ववैगुण्यात् व्याधिस्तत्रोपजायते ॥ १॥

  त्याचप्रमाणे एकच दोष कारणभदोंने स्थानांतरांत दूषित होऊन रोगांतर उत्पन्न करितो.

स एव कुपितो दोषः समुस्थानविशेषतः ॥
स्थानांतराणि च प्राप्य विकारान् कुरुते बहुन्ः ॥ १॥

  या श्वासकास विवेचनांत वायूचा संबंध आलेला आहे. व विकार तर कफाचे, तरी उत्पादक कोण ? वायु की कफ हा संशयहि कायम राहतो तरी कफाचे वाढीमुळे वायूचे गतिधर्मात आलेली विकृति अर्थात् प्राधान्य किंवा कर्तृत्व कफाचे आहे असें सहज ध्यानी येईल. आतां कफाचे विकारांत किंवा एकंदर विकारांतच ज्याचे प्राधान्य असा राजयक्ष्मा किंवा कफक्षय याचे कर्तृत्व कफाकडे कसे आहे ते पाहूं.

राजयक्ष्मा-कफक्षय.

  राजयक्ष्मा या विकाराला कफक्षय या नावाने ओळखण्यांत येते. हा विकार कफाने होत असल्याने याला कफक्षय हे नांवहि अन्वर्थकच आहे. सरसकट क्षय या नावाखाली जे विकार येतात त्यांचे दोन प्रकार संभवतात. एक कफजन्य क्षय व दुसरा वातजन्य क्षय. क्षय म्हणजे शरीरांतर्गत रक्तादि धातु क्षीण होणे होय. आणि याच तत्वाला अनुसरून क्षयामध्ये फरक मानण्याचे कारण नाही. तथापि दृश्य विकार जरी एकाच स्वरूपाचा असला तरी त्याची कारणपरंपरा प्रसंगविशेषीं भिन्न असते. आणि तिच्या अनुरोधानेच विकाराचा उपशम करणे शक्य असते. क्षयाचे उत्पत्तिकारणांचा उल्लेख करीत असतां आयुर्वेदात मुख्यतः चार कारणे सांगीतली आहेत. ती:-साहसं वेगसंरोधः शुक्रौजःस्नेहसंक्षयः ॥ अन्नपानविधि त्यागश्चरवारस्तस्य हेतवः ॥ १ ॥ साहस म्हणजे शक्तिबाह्य काम करणे, मल, मूत्र इत्यादि त्रयोदश वेगांचा अवरोध करणे, शुक्र, ओज व शरीरांतील मज्जामेदस इत्यादि स्नेहधातूंचा क्षय होणे, व अव्यवस्थित आहार या चारहि कारणांचा विचार केला असतां क्षय हा विकार केवळ वायूचाच अशी अगदी सहज व उघड उघड कल्पना होते कारण साहसादि ही सर्व वायूलाच प्रकुपित करणारी आहेत. अति व्यायाम किंवा श्रम झाल्याने ऐशी वात विकारांपैकी, वक्ष उद्धर्षः म्हणजे वक्षस्थलांत जोराचे घर्षण होऊन त्यायोगें क्षत होईल व त्यामुळे क्षय होईल. (तस्य अतिमात्रेण कर्मणा उरः क्षतयुपप्लवते वायुः) (चरक ). वेगांचा अवरोध केल्यानेही वायूचाच