पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/४९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३६
आयुर्वेदांतील मूलतत्वें.



चा एक विशिष्ट संघ बनला आहे तो घडण्यासाठी, त्याची वाढ होण्यासाठी आणि विकृतीमध्येहि मुख्यतः या श्लेषकतेची आवश्यकता असते. याच प्रकारचे त्याचे आयुर्वेदामध्ये वर्णन आहे. प्रत्येक विकारांत याचा कसा उपयोग होतो हे समजणे जरी येवढ्यावरून कठीण पडेल, तथापि सर्व विवेचन ध्यानी घेतले असतां बराच खुलासा होईल अशी उमेद आहे. शिवाय पित्त आणि वायु यांचाहि विचार झाल्यावर बरीच स्पष्टता येईल. आतां तूर्त त्रिदोषांचे विवेचनांतील कफवर्णनानंतर पित्त म्हणजे काय याचा विचार करूं.

-----
-आयुर्वेदांतील त्रिदोष-पित्त-
---***---
पित्त म्हणजे काय?

 मागें लिहिल्याप्रमाणे कफाचे स्वरूप ध्यानी घेतल्यावर सहज लक्षांत येईल की, कफाचे किंवा श्लेष्म्याचे जे विसर्ग या नावाने संबोधले गेलेले कार्य ही शरिरांतील पहिली क्रिया होय. शरिराच्या घटकांची वाढ ज्या आहारवस्तूंतील घटकांनी व्हावयाची त्यांचा संग्रह करणे एवढे कार्य सामान्यतः या कफरूपी शरीरांतर्गत श्लेषक शक्तीने होते. यापुढील कार्य म्हणजे संग्रहित घटकांचे शोषण होऊन ते शरीरघटकांशी एकरूप होणे हे आहे. ही एकरूपता आल्याशिवाय पोषण होत नाही. याच क्रियेला पचन या नांवाने ओळखले जाते. पचन याचा तात्पर्यार्थहि असाच आहे की, शरिरांत येणारे बाह्यसृष्टीतील उपयोगी घटक पचविणे अर्थात् स्वकीय करून घेणे प्रत्येक पदार्थ स्वरूपतः भिन्न असतो, आणि त्यांतील सूक्ष्मतत्वे कमी अधिक प्रमाणांत एकच असतात. शरिरांत सप्तधातुस्वरूपांची जी द्रव्ये आहेत, त्याच स्वरूपांची द्रव्ये सृष्टीतील अनेक पदार्थात भिन्नप्रमाणाने आहेत. त्यांचे प्रमाण आणि रचनाविशेष अथवा मिश्रण यांना अनुसरून पदार्थांना आनंत्य आले आहे. या अनंतपदार्थामधून शरिरोपयोगी पदार्थ तेवढे घेऊन बाकी फेंकून देणे हे कार्य करणारी अशी एक शक्ति शरिरांत असते. शरिराच्या प्रत्येक भागांत हे कार्य व्हावयाचे असल्याकारणाने तिचे वास्तव्य सर्व शरीरव्यापी असावे लागते. शरिरात मुख्यतः ज्या क्रिया चालतात त्यांमध्ये भर पडल्यावर किंवा पोषकघटकांचा संग्रह झाल्यावर त्यांतून शरीरसदृश असे घटक काढून घेण्याचे दुसरे कार्य सुरू होते. याकरितां आयुर्वेदियांनी ही एक मुख्य क्रिया मानून तिचा, मुख्य तत्व म्हणून उल्लेख केला आहे. व अशा अर्थाला सुचविणारे असे तिला पित्त हे नांव दिले. पित्त म्हणजे शरिरामध्ये पाचनकार्य करणारी अशी एक