पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/५०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३७
पित्त या शब्दाचा अर्थ,



शक्ति होय. पचन ह्या शब्दांतच सारभाग आणि मलभाग याचे पृथक्करण याचाहि अंतर्भाव होतो. आयुर्वेदातील पित्त हे अशा रुपाचें आहे ही गोष्ट ध्यानी घेतल्यावर असली पचनशक्ति ज्या पदार्थाचे आश्रयाने राहण्याची त्या शक्तिमय पदार्थाचे स्वरूपहि कळणे सोपे होते.कोणतीहि शक्ति किंवा गुण हे पदार्थाशिवाय प्रत्ययाला येणारे नसतात.आणि यासाठी शास्त्रीय व्यवहाराचे सोईकरितां नुसत्या शक्तीचे सात्विक वर्णन न करितां ज्या पदार्थामध्ये त्या शक्तीचे किंवा गुणाचे प्रमाण पुष्कळ असते आणि ज्यांचेवरून त्या शक्तीचा उपयोग होत असतो, अशा पदार्थाचे वर्णन केले जाते. आयुर्वेदांतील पित्ताचे वर्णनही अशाच रीतीने पाचक कार्य करणारी शक्ति ज्यांत विशेष अनुभवास येते अशा पदार्थाचे आहे. शरीराश्रयी अशी ही शक्ति असल्याने अर्थातच शरीरांतील या जातीध्या पदार्थामुळे या शक्तीचे कार्य घडते त्याच पदार्थाचे वर्णन शरीरशास्त्रांत अर्थात् आयुर्वेदात असणार हे उघड आहे.

______
पित्त या शब्दाचा अर्थ.

  पित्त या शब्दाची व्युत्पत्ति आयुर्वेदामध्ये दिली आहे. तीत 'तप् या मूळधातूपासून व्याकरणाच्या विशिष्टनियमान्वये पित्त हा शब्द तयार झाला आहे. तप् या धातुचा अर्थ तापणे अथवा तापविणे असा असून अर्थातच हे तत्व म्हणजे उष्णताप्रधान आहे असा निर्देश केला आहे. आरंभी दिलेल्या श्लोकात या तत्वाचें सूर्याशी साम्य दाखवून पंचमहाभूतांतील उष्णता किंवा तेज यावर या पाचनात्मक तत्वाची उभारणी असल्याचे सदर श्लोकाने दाखविले आहे. सर्व सृष्टीचे स्थूळ आणि सूक्ष्म असें वर्गीकरण मानल्यास त्यांतील या दोनहि वर्गात उष्णता राहू शकते. परंतु शरीर हे पार्थिव अर्थात् स्थूल आहे व म्हणूनच त्यांत वास्तव्य करणारी पाचनशक्ति ही स्थूल परमाणूचा आश्रय करणारी आहे, ही गोष्ट उघड आहे. आयुर्वेदाने पित्ताचे वर्णन असें केलें आहे.

पित्तं सस्नेहतीक्ष्णोष्णं लघु विस्रं सरं द्रवम् ॥

  ज्यात थोडासा तेलकटपणा आहे, जे तीक्ष्ण म्हणजे ज्यांत भपकारा आहे, स्पर्शाने ऊष्ण, वजनाला हलके, ज्याला आंबुस घाण येते असे पातळ आणि अधोगामी असें शरिरांतील पित्त आहे. या वर्णनावरून आयुर्वेदांत वर्णिलेले पित्त म्हणजे केवळ ऊष्ण तत्व नसून उष्णता ज्यांत राहते असें एक प्रवाही होय असा सहज बोध होतो. मागें द्रव्याचे वर्णन करतांना कोणतेंहि द्रव्य अंबुयोनि आहे असा उल्लेख आहे. पार्थिव परमाणूंचा अप् किंवा आर्द्रता अथवा ओलेपणा--पातळपणा-यांशी संयोग झाल्याशिवाय द्रव्याची उत्पत्ति होत नाही. या पातळ