पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/५५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४२
आयुर्वेदांतील मूलतत्वें.

 लागतात. एरवी स्रोतसांमध्ये त्याचा नीट प्रवेश होणार नाहीं व शरिराचें पोषण होणार नाहीं. आणि अशा स्वरूपाचा रस न झाला तर त्यामुळे स्रोतसांमध्ये चिकटपणा वाढेल, आणि विकार उत्पन्न होतील. या रसावर संस्कार होऊन त्यांतून जो मळ निघतो तोच उरस्थानांतील स्निग्ध, चिकट अशा स्वरूपाचा कफ असल्याचा उल्लेख मागें कफप्रकरणांत आला आहेच. या संस्काराशिवाय स्त्रोतसांत प्रवेशालायक असें त्याला स्वरूप देतां येत नाहीं. तें येण्यासाठी हृदयामध्यें पित्ताची अवश्यकता आहे. याच पित्ताच्या क्रियेमुळे रसाला तांबडेपणा येतो व म्हणून रसाला रंगविणाऱ्या या पित्ताला रंजक म्हणजें रंजविणारें असें नांव दिले आहे. या पित्ताची शरिरांत न्यूनता झाली असतां रस दूषित होऊन पोषणाचे कार्य नीट होत नाहीं व रसाश्रयी अशा दोषाच्याकफाच्या वृद्धीमुळे होणारे विकार उद्भवतात.
 चतुर्विध आहारांतून पाचक पित्ताचा संस्कार झाल्यावर निघणारा रस हाच सर्व धातूंना पोषक असतो. व तो रस रक्तादि धातूंचे दृष्टीनें अपक्व किंवा आम असतो. याच उद्देशाने जर या रसाचें पचनस्थानरूपी यकृताला आमाशय नांव योजण्यांत आलें असेल तर मात्र आमाशय हैं रंजक पित्ताचें स्थान ठरेल. परंतु अशा धात्वर्थावरून या स्थानाला आमाशय म्हणावयाचे तर प्रत्येक धातु हा त्यापुढील धातूचा आमाशयस्वरूप मानावा लागेल. करतां रंजक पित्ताचें आमाशय हे स्थान सांगण्यापेक्षां सरळ अर्थाने ' यकृत ' हें जें सांगितलें आहे, तें सयुक्तिक आहे.
 याशिवाय, आमाशय या शब्दानें लघ्वेंत्रे - लहान आंतडीं--यांचाहि उल्लेख करण्यांत येतो. ज्वराचे संप्राप्तीमध्ये ( दोषाद्यामाशयाश्रयाः । आमाशायस्थोहत्वाऽग्निं । ) या वाक्यांनी निर्दिष्ट आमाशय म्हणजे लध्वंत्रे होत. यांतहि सर्व प्रकारें अन्नाचे पचन झालेले नसते. यावरून आम -- अपक अन्नाचा आशय--या दृष्टीने आमाशय हैं नांव देतां येईल. मात्र या भागाला यथार्थ नांव पच्यमानाशय हें द्यावयास पाहिजे. कारण येथे आहार पच्यमान अवस्थे मध्ये असतो. अन्नपचनाचे बाबतींत सारकिट्टांचे पृथक्करण ग्रहणीचे ठिकाणीं ( लघ्वंत्राचे टोक ) होतें तथापि सर्व यंत्रांमध्ये त्यांत पित्ताचें मिश्रण होत असले म्हणजे, शिजणें आणि पृथक्क्र्र्ण अशा पचनांतील दोन अवस्था अनुक्रमें लघ्वंत्रे व त्याचे शेवटचें टोंक यांत घडतात. अन्नांत पित्ताचें मिश्रण होणें अवश्य असते व हें पित्त यकृतांतून पित्तवाहिनींतून आंतड्यांत उतरतें. याचे मिश्रणाने पच्यमान अवस्थेतील अन्नाचाहि रंग पालटतो. है ध्यानी घेतां पच्यमानाशयांत कार्य करणारें पित्त अन्नाचें रंजन -- रंगविणें-- करणारे असे म्हणतां येईल, मात्र ' रसरंजनात् '