पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/६

हे पान प्रमाणित केलेले आहे.



( ३ )

त्याप्रमाणे इंग्रजी वैद्यकाची दीक्षा घेतलेल्या देशी डॉक्टरांचे आयुवेदाची निंदा हे प्रमुख कर्तव्य होते म्हटल्यास अतिशयोक्ति होणार नाही. आयुर्वेद ना? कसलें तें शास्त्र; उगाच काही तरी आचरट कल्पना आहेत झाले. सहज अनुभवाने चार औषधे होतात गुणावह म्हणून ते काही शास्त्र होत नाही. असली भाषा डॉक्टरांच्या जीभेवर छापलेली असावयाची. त्यांतल्या त्यांतहि कांहीं शोधक विवेचक महत्वाकांक्षी अशा डॉक्टरांची आयुर्वेदाकडे दृष्टी वळलीच तर टीकेच्याच बुद्धीनें ! पण या थोड्याश्या निरीक्षणानेहि काहींच्या मनांत काही थोडा फार विश्वास उत्पन्न होऊन जिज्ञासाहि जागृत झाली. आणि या जिज्ञासेनें आयुर्वेदाचे परिशीलन करणाऱ्यांना त्यांत शास्त्रीयत्व भासू लागले. तथापि स्वतःला परिचित नाही अशा विचारपद्धतीमुळे व विशिष्ट परिभाषेच्या अज्ञानामुळे आयुर्वेदाची उपपत्ति पटेना आणि ती पटेना यामुळे आयुर्वेदाला शास्त्र तर म्हणता येईना तरी पण शास्त्र न म्हणतां आयुर्वेदाला सोपपत्तिक न मानतां त्याचा स्वीकार करून योग्य तो फायदा करून घेण्याला तयारी दाखविण्यांत आली. असली विचारसरणी महाराष्ट्रामध्ये प्रथम कै. डॉ. गणेश कृष्ण गर्दे एल्. एम्. एस्. यांनी जाहीर केली. सदरहू डॉक्टर मोठे विद्वान्, शोधक व जबर व्यवसायी असून त्यांनी आयुर्वेदाच्या वाङ्मयापैकी अष्टांग हृदय व माधव निदान या ग्रंथांची मराठीत भाषांतरे केली आहेत. अर्थातच यामुळे त्यांचा आयुर्वेदाविषयींचा व्यासंग उघड होतो. तथापि त्यांचे आयुर्वेदीय व्यासंगामध्ये योग्य ती परिभाषा शुद्ध विचारसरणी नसल्याने आयुर्वेदाचे शास्त्रीयत्व त्यांना पटले नाही आणि अशा स्थितीत त्यांनी आयुर्वेदाची जी स्तुती म्हणून केली आहे, ती उलट आयुर्वेदाचे नुकसानीलाच कारणीभूत झाली. आयुर्वेदाला शास्त्रीयत्व नाही, त्यांतील त्रिदोषांची उपपत्ती चुकीची, काल्पनिक अतएव त्याज्य हें मत त्यांनी अनेक वेळां प्रतिपादन केले आहे. इतकेच काय पण त्यांच्या सर्व विवेचनाचे धोरणच त्रिदोषवाद खोटा मानणे हे आहे असे त्यांनी माधव निदानाची व अष्टांग हृदयाची भाषांतरापूर्वी जी प्रस्तावना दिली आहे ती पाहणाऱ्याचे ध्यानी येईल आणि याच मताचा पुरस्कार बरेच दिवसपर्यंत बऱ्याच