पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/६५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५२
आयुर्वेदांतील मूलतत्वे.



अंतर्भाग मृदु नाजुक असतात, त्यामुळे या रक्ताचा परिणाम सर्वांआधीं या भागांवर होतो; आणि त्यांचे अंतर्भागांतील नाजुक त्वचेचा विदाह होतो व फाटते. अशा प्रकारें हीं लक्षणें पित्ताचे तीक्ष्ण गुणांचे वाढीने होतात.

'शोणितक्लेदश्च मांसक्लेदश्च '

"  ह्मणजे रक्ताचा आणि मांसाचा अभिष्यंद-पाणी सुटणे, पित्तामध्यें तीक्ष्णोष्ण अशा गुणांची वाढ झाल्याकारणानें रक्तांत हे गुण वाढून त्यामुळे विदग्धावस्था किंवा कुजण्याची क्रिया सुरू होते, त्यामुळे रक्त आणि याच रक्ताचे संसर्गानें नंतर मांसामध्येहि अशीच विकृति होते. रक्तांत तीक्ष्णोष्ण गुणांचे पित्ताची वाढ या लक्षणांचें कारण आहे. त्वग्दाहश्च, मांसदाहश्च ' त्वचेचा दाह आणि मांसाचा दाह हीं दोन लक्षणेंहि रक्तांत उष्ण गुणांची वाढ झाल्यामुळे होतात. रक्त अधिक उष्ण झालें ह्मणजे त्वचेचे सान्निध्यामुळे प्रथम त्वचेचा दाह होतो आणि हीच विकृति वाढल्यास ह्या रक्तांतील उष्णता आश्रयभूत रक्ताचाहि दाह करते. ' रक्तकोठश्च, रक्त विस्फोटाश्च, रक्तमंडलानि च, म्हणजे त्वचेवर तांबड्या गांधी, तांबडे फोड व तांबड्या गांधींची मंडळे उठणें ह्रीं तीन लक्षणे रसाचा विदाह आणि त्यामुळे अभिसरण नीट न होणे याची निदर्शक आहेत. रसाचें अपचन होऊन त्यामध्ये फार थोड्या प्रमाणांत विदाह झाला म्हणजे गांधी उठतात. याचा अर्थ तेवढ्या भागांतील अभिसरण नीट होत नाहीं. याच गांधी अधिक विकृतीने अधिक झाल्या की तें रक्तमंडळ आणि त्वचा किंवा लस यांमध्ये विकृति झाल्याने म्हणजे रस विदग्ध झाल्याने लाल फोड येतात. ही विकृति म्हणजे रसधातु आणि त्वचा यांमध्ये पित्ताची अम्लगुणविशिष्ट विदग्धावस्था होय. ' रक्तपित्तं च, रक्तामध्ये पित्ताची वाढ झाल्यामुळे पित्त आणि रक्त यांचा मिश्रस्राव. पित्ताची रक्तांत वाढ अर्थात् रक्ताशय म्हणजे यकृत, प्लीहा आणि शरीरांर्तगत लहानमोठ्या रक्तवाहिन्या यां । होते. यांत पित्ताची वाढ झाली कीं, अति तीक्ष्ण, अति ऊष्ण अशा रक्ताच्या स्पर्शाने ठिकठिकाणीं रक्ताशय आणि वाहिन्या यांमध्ये क्षत होऊन रक्तस्त्राव होतो. हा एक विदारणाचा परिणाम असतो. ज्या वेळी रक्तामध्ये विदारक अशा क्षारत्वाची वाढ पित्ताचे तीक्ष्णोष्ण गुणांनी होते, त्यावेळी हा विकार होतो. 'हरितत्वं च, हारिद्रत्वं च, नीलिका च, त्वचेवर हिरवेपणा, पिवळेपणा आणि नीलसरपणा येणें किंवा नीलिका म्हणून सांगितलेला एक विकार ( सदर विकार क्षुद्ररोगांमध्ये सांगितला आहे तथापि हैं नीलिकालक्षण त्याचे जोडीचे दोन विकार पाहतां आणि हीं सर्व पित्ताचीं विकृतावस्थेत उत्पन्न होणारीं लक्षणें आहेत ह्या गोष्टीचा विचार केला असतां, क्षुद्ररोगांतर्गत 'नीलिका