पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/६७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५४
आयुर्वेदातील मूलतत्वे.


 "हरितहारिद्रसूत्रनेत्र वर्चस्त्वं च" मूत्र, नेत्र, आणि मळ यांवर हिरवेपणा, पिवळेपणा येणे या लक्षणाचे बाबतींत विशेष इतकाच की, नेत्रांचा वर्ण हा रक्ताने होणारा. नेत्र रक्ताचा आदर्श होय, आणि मूत्र आणि पुरीप यांचा वर्ण म्हणजे पच्यमानाशयांत होणाऱ्या पित्ताच्या मिश्रणाचा निदर्शक आहे. येथील पित्ताच्या निळेपणाचें आधिक्याने हिरवा पीतत्वाचे आधिक्याने पिवळा असा पुरीषरूपि घन आणि मूत्ररूपि द्रव मल व्हावा हे स्वाभाविकच आहे. "कक्षा च" हा विकार म्हणजे खाका, खांदे किंवा पार्श्व या भागी होणारे वेदनायुक्त आणि कृष्णवर्णाचे फोड, मागें रक्तविस्फोट, म्हणून सांगितल्या प्रकारचीच ही विकृति आहे. मात्र क्षीणावस्थेत रक्ताचा रंग ज्यावेळी काळसर होतो, त्यावेळी जे कृष्णवर्ण फोड उठतात त्यांना हे नांव आहे. यांतील पित्तविकृति रक्तांतील पण वातमिश्र अशी असते. तिक्तास्यता च,पूतिमुखता च,तोंड कडू होणे आणि तोंडाला घाण येणे ही लक्षणे यकृतांतील पित्ताने रसपचन न झाल्याची आणि आमाशयांतील अन्न न पचल्याची आहेत. या दोन्हीहि ठिकाणी रसांत वा अन्नांत ज्यावेळी पित्ताचे तीक्ष्ण, अम्लगुण वाढतात, अर्थात् आंबुसपणा येतो त्यावेळी त्याच जिभेवर झालेला हा परिणाम असतो. अन्नरस ज्यावेळी फार अपक आणि मलमिश्र स्थितीत असेल त्यावेळी तोंड आणि रसनेद्रिय यांमध्ये-मळाचे प्रमाण वाढून त्याला नासकेपणाची घाण आणि याच अवस्थेतील अधिक तीक्ष्णतेमुळे किंवा कुजण्याचे धर्मामुळे कडूपणा हे विकार उत्पन्न होतात. " तृष्णायाःआधिक्यं च " तहान अधिक लागणे. उष्णतेचे प्रमाण वाढल्याने पचनद्रिये, रक्ताची स्थाने आणि रक्त या सर्वच ठिकाणी शोषण अधिक होते. स्वेद किंत्रा बाष्प या अवस्थेत तयार होऊन शोषणाला सुरवात होते. अर्थात् कमी झालेल्या जलांशाची मागणी म्हणजे तहान हे लक्षण उष्णता या पित्तगुणाने संभवते. यकृत् हे पित्ताचे स्थान असून त्या ठिकाणी अन्नरस आल्यानंतर त्यांत या पित्ताचे (रंजकपित्ताचे) मिश्रण होऊन त्याला रक्तवर्णता येते. त्यावेळी अन्नरसांतील स्निग्धता, पांढरेपणा अणि कांहीं जलांश हा यकृताचे अधोभागी एका “सच्छिद्र पेशीमय" भागांत थोडा वेळ संचित होऊन त्या ठिकाणाहून जलवाहिनीतून शरिरांत पसरतो. रसांतून निघणा-या अर्थातच सूक्ष्म प्रमाणांत असल्याने, अन्नांतील जलांशाच्या बस्तिरूपी आशयाप्रमाणे त्याचा आशय नाही; तथापि तो ज्या भागीं प्रथम स्रावून संचित होतो, तो भाग यामुळे थोडा फुगीर व पाणी साचल्यामुळे अधोभागी रुंद, वरचा निरुंद, असा दिसणे स्वाभाविक आहे. याच यकृतांतील भागाला आयुर्वेदांत क्लोम, हे नांव असून त्याचा आकार तिळासारखा असल्याचे सांगितले आहे.