पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/६८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५५
पदार्थाची उत्पत्ती.



तिळासारखा आकार म्हणजे खाली रुंद व अरुंद होय. पातळ कातड्याचे पिशवीत थोडेसें तळालाच राहील असे पाणी असतां असा हा आकार दिसतो. हीच कल्पना क्लोमाला तिळाचा आकार सांगण्यांत आहे. या स्थानांत थोडासा रसांतून स्रवणारा जलांश असतो. व यकृतांत पित्ताची उष्णता वाढतांच त्या भागांतील जलांशाचे शोषण आरंभी होऊन त्याचे मार्फत होणारा पुरवठा कमी होतो. म्हणूनच हे पिपासास्थान मानण्यांत आले आहे.
 क्लोमाचे अस्तित्व नाही म्हणण्यापूर्वी या वर्णनाचें अधिक सूक्ष्म दृष्टीने अवलोकन केले पाहिजे. “ अतृप्तिश्च" जठरांतील पाचक पित्ताचे वाढीने लवकर अन्न पचल्याने हे लक्षण उत्पन्न होतें. यालाच तीक्ष्णाग्नि किंवा अत्यग्नि नांव आहे. "जीवादानं च" पित्ताचे तीक्ष्णादि गुणांची वाढ झाल्याने रक्तपित्तविकार होतो. आणि अतिरिक्त स्राव झाल्याने जीवनाधार रक्ताचे अभावी जीवनाचा नाश होतो. या अतिरक्तस्रावाला कारण पित्त ह्मणून जीवादान हणजे जीवनाचा शोष पित्ताचे विकारांत घालण्यात आला आहे. अर्थात् जखमेमुळे होणाऱ्या रक्तस्रावाला हे नांव नसून अंतर्गत पित्तविकृतीपासून होणा-या रक्तस्रावाचे हे नांव आहे "तमःप्रवेशश्च" पित्ताचा ऊष्ण गुण वाढून तैजस इंद्रिय जें नेत्र त्यांमध्ये हे सहन न होण्यासारखे तेज वाढल्यामुळे हा विकार होतो. आलोचक या पित्ताचा हा विकार डोळ्यापुढे आंधेरी येणे या नावाने ओळखण्यांत येतो. नेत्र तैजस आहे; तथापि तेजाच्या फाजील वाढीनें त्याचा नाश होतो.

अश्मनो जन्म लोहस्य तत एव च तीक्ष्णता ।।
उपधातोपितेनैव तथा नेत्रस्य तेजसः ।। १॥ अ० हु.

  याप्रमाणे पित्ताची अनेक विकारांतर्गत ही चाळीस लक्षणे किंवा विकार होत. आशय आणि इंद्रिये यांची रचना आणि कार्य यांना अनुसरून अनेक रोगांत यांचा समावेश असतो. अर्थात् व्यस्त अथवा समस्त प्रमाणाने असतो. आतां पित्तामुळे रोग कसे उत्पन्न होतात ? याविषयी विचार करावयाचा. लक्षणे आणि रोग याविषयी पूर्वी कफाचे प्रकरणामध्ये खुलासा केला आहे. पित्ताच्या शरीराला अवश्यच ज्या क्रिया त्यांचे विकृतीमुळे होणा-या रोगांचे उदाहरणांनी त्याचा खुलासा करावयाचा. पित्ताची सर्वसामान्य लक्षणे कोठे व कशी होतात याचा विचार केल्यानंतर पित्तामुळे होणारे रोग कसे होतात याचा विचार करूं.

पित्ताचे रोग.

  आरंभी सांगितलेच आहे की, विकार म्हणजे केवळ वाढ नव्हे,