पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/७५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६२
आयुर्वेदातील मूलतत्वें.



उष्णतेवर आहे, असा केल्यास चूक होईल. या औषधाची आयुर्वेदीय प्रांत योजना अम्लपित्त या प्रकरणांतच आहे ही गोष्ट लक्षांत घेतां त्याचे उपयोगाचें धोरण ध्यानी येईल.
 केवळ उष्णस्वरूपी पित्ताचे विकार ह्मणजे धातुशोष, दाह, तहान, भूक, डोळ्यांची आग, अल्पनिद्रा अशा स्वरूपाचें, केवळ उष्णतेची वाढ दाखविणारे असेच आहेत. बाकी विकार ह्मणजे प्रवाही पित्ताचे आहेत. कुष्ठ, व्रण, विसर्प इत्यादि विकार आणखी आहेत परंतु ते धात्वाश्रयी प्रवाही पित्ताच्या विदग्धावस्थेमुळे होणारे असून कोठें अम्लतेमुळे कुजणें तर कोठें तीक्ष्णतेमुळे विदारण अशा स्वरूपाचे आहेत. या एकंदर विवेचनावरून पित्ताचे स्वरूप ध्यानीं येईल. आयुर्वेदामध्ये शरीराच्या मुख्य अशा ज्या तीन क्रिया त्यांपैकीं दुसरी पचनाची क्रिया करणारे असे सामर्थ्यसंपन्न जे धात्वाश्रयी परमाणु त्यांना पित्त हैं नांव दिले आहे. अन्नपचनाचेविषयीं फारशी शंकेला जागाच असत नाहीं. परंतु सर्व शरीरांतील सर्व पदार्थांचे सदैव पोषण व्हावें लागतें, व तसें तें होतहि असतें. ज्याप्रमाणें अन्न हे सर्व शरीराचे पोषक आहे त्याचप्रमाणे पहिला धातु हा दुसऱ्याचा पोषक असतो. म्हणजे रसरक्तादि क्रमानें सात धातु, आपल्या पुढील धातूमध्ये रूपांतरित होत असतात, आणि हें रूपांतर होणें रक्तापासून मांस, मांसापासून मेद, हे काम त्या त्या भागांत जी नैसर्गिक पचनशक्ति असते तीमुळे होते व याच पचनशक्तीला पित्त हें यथार्थ नांव आहे. धातुपोषणाचे बाबतींत आयुर्वेदामध्ये प्रामुख्यानें तीन मतें किंवा प्रकार वर्णन केले आहेत. त्यालाच तीन प्रकारचें रुधिराभिसरण असेंहि व्यावहारिक भाषेत म्हणतां येईल.
 पैकीं एक प्रकार असा की अन्नरस हृदयांत आल्यावर तो हृदय आणि उरस्थान यांना गति देणाऱ्या वायूकडून सर्व शरीरभर एकदम फेंकला जाणे आणि अशा प्रकारची निरंतर आणि निरोगी शरीरांत अव्याहत चालणारी पोषणक्रिया, अर्थात् जर रसधातु ( आधुनिक भाषेत रक्त) हाच सर्वत्र आणि सर्वकाळ शरिरांत पसरतो, तर शरीरपोषणाचा मुख्य क्रम म्हणजे रसविक्षेपच मानावा लागेल. व मग दुसरा प्रकार संभवणार नाहीं.

व्यानेन रसधातुर्हि विक्षेपोचितकर्मणा ।
युगपत्सर्वतोऽजस्त्र देहे विक्षिप्यते सदा ॥ १ ॥

अ. ह.

'रसगतौ, अहरहर्गच्छति इति रसः ॥

( सुश्रुत ॥ )

  दुसरा प्रकार म्हणजे, रसापासून रक्त, रक्तापासून मांस याप्रमाणे