पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/७६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लो.टिळक ग्रंथसंग्रहालय, वाई
६३
पित्तविकारापैकी ज्वर.


क्रमशः एका धातूहून दुसन्या धातूचें पोषण, अशा प्रकारचा. याचा क्रमः-
  रसाद्रक्तं ततो मांसं मांसान्मेदस्ततोऽस्थि च ।
   अस्थ्नो मज्जा ततः शुक्रं ॥

( अ.ह.)

  असा सांगितला आहे. हे दोन नियम व तदर्थसूचक वाक्यें स्पष्टपणें विरोधी भासतात. पहिल्यामध्ये अन्नरसच सर्व शरिरामध्ये अर्थात् सर्व धातूंमध्ये फेकला जातो असा अर्थ असून दुस-यात धातु-परंपरेचा विशिष्टक्रम सांगितला आहे. याचा अर्थ काय ? असा साहजिक प्रश्न उपस्थित होतो. करतां या विरोधाभासाचा प्रथम विचार केला पाहिजे. अगदीं उघड दिसणारी व पटणारी गोष्ट म्हणजे, विविध अन्नाचे पचन होऊन त्याला पातळ रसाचें स्वरूप येते. व अर्थात् हें स्वरूप असें असतें कीं त्याचा सर्व लहानमोठ्या शरीरविभागांमध्ये प्रवेश व्हावा. शरिराचे सर्व भागांत रक्तवाहिन्या आहेत व त्यांच्या अतिसूक्ष्म अशा सर्वत्र पसरलेल्या जाळ्यांतून हा रसधातु शरिराचें पोषण करितो. व तसाच उल्लेखहि आहे.

 याभिरिदं शरीरमाराम इव जलहारिणीभिः केदार इव कुल्यामिरुपीस्नह्यते अनुगृह्यते च (सु. शा.)
 सर्व शरीरभर पसरलेल्या या रसवाहिनींचे द्वारें बगीचा अथवा शेत पाण्याने भिजतें त्याप्रमाणे सर्व शरीर रसयुक्त होतें. म्हणजे पहिला प्रकारच अनिर्वाद ठरतो. व रुधिराभिसरणाचे बाबतींत सामान्य समजूतहि अशीच आहे. अर्थात् मग दुसरा नियम फोल ठरतो. परंतु वस्तुस्थिति अशी आहे की, वरील नियमान्वये एकदां सर्व शरिरामध्ये अर्थात् धातूमध्ये रसप्रवेश होऊन दैनंदिन विधी चालू झाला कीं, प्रत्येक धातूचें रूपांतर अथवा पर्यवसान कशांत होते ? हा प्रश्न कायमच राहतो. शरीर हा पदार्थ प्रतिक्षणीं उत्कांतावस्था भोगीत राहणारा आहे. व शरीर म्हणजे त्यांतील प्रत्येक धातु पच्यमान अवस्थेतील किंवा उत्कातीचे अवस्थेतील या धातूंचे कोणत्या तरि उच्च प्रतीच्या पदार्थामध्यें (धातु) संक्रमण अथवा रूपांतर झाले पाहिजे, व हें जें रूपांतर होतें याचाच अर्थ एका धातूपासून दुसरा धातु बनणे होय. व याला अनुसरून हा दुसरा नियम आहे. शरिराच्या धातूंकडे पाहिले असतां, प्रत्येक धातु एकापेक्षां अधिक स्वच्छ व त्या मानानें अधिक टिकाऊ आहे. व असें स्वरूप त्या त्या भागांतील नैसर्गिक पचनशक्तीने प्रत्येक धातूमध्ये निर्माण होतें. (या दुसऱ्या प्रकाराला केवळ रुधिराभिसरण असें संबोधणे अर्थशः विसंगत असून त्याला धातूचें अभिसरण असें नांव अधिक शोभेल. परंतु व्यवहारांत रूढ म्हणूनच रक्ताभिसरण हा शब्द योजला आहे. )