पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/८

हे पान प्रमाणित केलेले आहे.



( ५ )

परिस्थितीमुळे त्यांतील तत्वांविषयीं अज्ञान वगैरे समज उत्पन्न झाला आहे व तो जाणे जरूर आहे. आक्षेपकांना आक्षेपक म्हणून विचारांत घेण्याचे कारण नाही. पण जिज्ञासूंनी केवळ सहज पटत नाही म्हणून उपेक्षा करूं नये आणि आयुर्वेदीय चिकत्सकांनींही आयुर्वेदाची भाषा वर्तमान कालानुसार बोधक रीतीने समाजापुढे ठेवावयास पाहिजे. म्हणजे गैरसमज दूर होऊन योग्य सुधारणा झपाट्याने घडून येतील. बदललेल्या काळाला अनुसरून योग्य त्या सुधारणा न केल्या तर शास्त्रांत जीवंतपणा राहणार नाही; मात्र या सुधारणा करीत असतां मूळतत्वांचा विघात न होईल ही सावधगिरी ठेवणे अगत्य आहे.
 आयुर्वेदाची मूलतत्वे जे त्रिदोष आणि ज्यांविषयी सध्या अनेक प्रकारचे वाद आणि मतभेद माजून राहिले आहेत त्यांविषयी निश्चित मताची अत्यंत अवश्यकता आहे; कारण त्यावरच सर्व आयुर्वेदाची इमारत अवलंबून आहे. महत्वाचा भाग सोडून आयुर्वेदाची उन्नती करूं पाहणारांचे प्रयत्न म्हणजे प्राणशून्य शरीराची जोपासना होय, आयुर्वेदाच्या उपलब्ध वाङ्मयांत सर्वत्र त्रिदोषांचा उपयोग केला आहे. पण त्या त्रिदोषांचे स्वरूपाचे स्वतंत्र आणि स्पष्ट असें वर्णन कोठे असे नाही, की, ज्यावरून प्राचीन आयुर्वेद प्रवर्तक अमक्या वस्तूंना त्रिदोष समजत असे सांगता येईल. व यामुळेच या बाबतीत वाद माजून राहिले आहेत. यासाठी आयुर्वेदाच्या सुधारणेचे प्रयत्नांच्या मुळाशी त्रिदोषांची योग्य कल्पना निश्चित होणे जरूर आहे. ही कल्पना अशी असावयास पाहिजे की ती आयुर्वेदाच्या वाङ्मयाशी जुळती आणि निदान चिकित्सेच्या व्यवहारांत नित्यशः पूर्ण उपयोगी. केवळ शाब्दिक व्याख्या ठरवून भागणार नाही. त्रिदोषमीमांसमध्ये, पांचभौक्तिक संबंध अथवा पाश्चात्य वैद्यकांतील तत्वांचा संबंध लावून कसे तरी शास्त्रीयत्व प्रस्थापित करण्याने भागणार नाही. त्यांची व्याख्या अशी असावयास पाहिजे की, जी स्वीकारली असतां, नैसर्गिक जीवनव्यापार, स्वास्थ्यांतील नैसर्गिक शरीरधर्म व रोगकारक शरीरविकृति यांचा उत्तम खुलासा होऊन चिकित्सेचे धोरण सुगम होईल. नाही पेक्षा तो केवळ शब्दच्छल होईल.
 आयुवदाच्या सर्व विवेचनामध्ये ज्या अर्थी त्रिदोषांना अनुस