पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/८२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६९
वायु म्हणजे काय ?

 वायु नसेल तर सच्छिद्रता अबाधित राहणारच नाहीं. वर सांगितल्याप्रमाणे गतिसामर्थ्यसंपन्न असे वायूचे विरळ परमाणु यांमध्ये भरून राहिलेले असतात व ते अर्थातच गतियुक्त असल्याकारणानें सदैव त्यांची हालचाल चालू असते. व तिचा परिणाम आश्रयभूत स्रोतसांवर होऊन परस्पर संनिकर्षामुळे ही हालचाल सर्व शरीरभर अतिअल्प काळांतच पसरते. आणि शरिराचे मांस पेशीसारखे स्थूल अवयव जरि सक्रिय दिसतात, तरि त्यांच्या किया निवर्तक अशा गतीचा पुरवठा अंतर्गत जीं सूक्ष्म स्रोतसें तदाश्रयी वायूकडूनच होत असतो, ही सहज पटणारी गोष्ट आहे. सूक्ष्मतया सृष्टपदार्थांचे निरीक्षण केल्यास असे दिसून येईल की, परस्परविरोधी असेच पदार्थ कांहीं विशिष्ट मर्यादेमध्यें साहचर्यानें राहात असतात. आणि त्यांचें हें साहचर्यच परस्पर अस्तिवाला साधक असतें पंचभौतिक विवेचनामध्ये ' आकाशाचें' स्वरूप ' पोकळी' अर्थात् परमाणुरहित असें वर्णिले जाते. पण पोकळी दाखविण्याला आवरण असतें, तें अगदी विपरीत गुणाचें म्हणजे स्थूलस्वरूपि पार्थिव असेंच असते. शरिरामध्येंहि स्रोतोरुपि जें आकाश त्याचे आवरण मांसमय अर्थात् स्थूलाश्रयी असते. हे जे परस्परविरोधी पदार्थ ते एकत्र राहून एकमेकांचे सामर्थ्यानें परस्परांना जणुं पराजित करण्याचे प्रयत्नात असतात. व या प्रयत्नांमध्येच जी शरिराची हालचाल स्वाभाविक घडून येते, तीमुळे त्यांच्या नित्य व्यापारांची उत्पत्ति होते. दैववशात् किंवा आहाराचारवशात् ज्या प्रकारच्या पदार्थाला बाह्यतः मदत होते त्याचे सामर्थ्य वाढून विरुद्ध गुणांचे पदार्थाची किंवा तदाश्रयी गुणाची क्षीणता होऊन नेहमींच्या सम प्रमाणावस्थेतील स्वाभाविक क्रियांमध्ये अव्यवस्थितपणा येतो. व या अपरिचित वैधर्म्याला चिकित्साशास्त्रामध्ये रोग हें नांव देण्यांत येते.
 अशा प्रकारे यांचे हे साहचर्यच एकमेकांना मर्यादित ठेवण्याचें उत्कृष्ट साधन होते. पार्थिव असें जें शरीर त्यामध्ये स्वाभाविकतयाच पार्थिवांश किंवा स्थूलता अधिक ही गोष्ट खरी असली तरि पार्थिव परमाणूंची देवघेव, आयात, निर्गत किंवा आयव्यय व त्या व्यवहारांतील सहज व्यापारांनीं घडून येणारा दैनंदिन कार्यक्रम या सर्वांचें कर्तृत्व स्थूलत्वरहित व गतिशील अशाच पदार्थांकडे असावयाचें. या क्रिया नाहीशा झाल्यावर क्रियाशून्य झालेले जड शरीर थोडावेळ सुद्धां टिकू शकत नाहीं. व ह्मणून शरिराचें अधिष्ठानभूत जे पार्थिव व आप्य द्रव्य किंवा आर्द्र परमाणुगण त्याच्या क्रिया निवर्तक अशा ज्या दोन तत्वांचा कफ व पित्त या नांवानें उल्लेख केला. त्यांचे संग्रहात्मक व पचनात्मक कार्य होण्याला संक्रमण घडविणान्या गतीची अत्यंत आवश्यकता व ती ज्या अणूंच्या आश्रयाने उपयोगी पडते, तो शरीरां-