पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/८३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७०
आयुर्वेदांतील मूलतत्वें.

 तर्गत पदार्थ वायु होय. गतिमत्व मानतांच तो पदार्थ ' हलका ' आहे. ही गोष्ट उघड होते. जडाला गति नाही. पदार्थ हलका असणें याचें सहजगम्य कारण ह्मणजे त्यामध्यें घनता नसणे, विरलता असणें हें सहज ध्यानी येतें. विरळ असण्याचें कारण चिकटविण्याला किंवा परमाणूंचे परस्पर सन्निकर्षाला साघनीभूत अशा स्निग्धतेचा अभाव व या स्निग्धतेच्या अभावी कोणताहि पदार्थ खरखरीत असणार न चिकटल्यामुळे विरळ अर्थात् सूक्ष्म असणें अणुभूत पदार्थाचें स्वरूप राहून त्याला सूक्ष्म मार्गातून प्रवेश सुलभ होतो. गति हैं तत्व व तदाश्रयीभूत पदार्थांचें हें स्वरूप विशद करण्यासाठींच आयुर्वेदानें वायूचें वर्णन--

' तत्र रूक्षो लघुः शीतः स्वरः सूक्ष्मश्चलोऽनिलः ॥ '

 वायु रुक्ष, हलका, खरखरीत, सूक्ष्म चंचल व शीत असे केलें आहे. हें वर्णन गतीचे नसून गतिमान् पदार्थाचें आहे. गति हा धर्म किंवा गुण आहे. व गुणावर गुणाचा आरोप करतां येत नाही. गुण हे गुणयुक्त नसून पदार्थ गुणी असतात, हे तत्व अबाधित आहे. कफ आणि पित्त याप्रमाणेच वायु हाहि सूक्ष्म कां होईना पण पदार्थच आहे. तसें न मानल्यास 'गति' सूक्ष्म खररूक्ष मानावी लागेल. आणि तसें मानणें हास्यास्पद होईल शिवाय वैद्यशास्त्रामध्ये हे पदार्थ अशा प्रकारे मानले आहेत की त्यांची न्यूनाधिकता बाह्य सृष्टीतील पदार्थांनी करून सारोग्यविघातक असे वैषम्योत्पन्न व्याधि दूर करावयाचे असतात. वायु कमी झाला असतां वातकारक पदार्थाची भर घालावयाची. आणि कमी करावयाचा म्हणजे प्रत्यक्ष वायु काढून टाकणे, अर्थात् पदार्थ काढून टाकणे, शोधन बस्तीनें पक्वाशयामध्ये असलेला अतिरिक्त व विकारकारी वायु काढून टाकावयाचा असतो. यासाठी दोषांना पदार्थच मानणे भाग आहे. शेकणे वगैरे उपायांनीं वायूचे शमन होतें. आणि अशा वेळीं वायूचें, पदार्थ हाणून उत्सर्जन होत नाहीं. परंतु ही क्रियाच वातनाशक नव्हे. शेकण्यानें वायूचें केवल स्थलांतर होते. तत्त्वतः न्यूनाधिक्य होत नाहीं. आणि ह्मणूनच त्याचे पदार्थत्वाला बाध येत नाहीं.

शरीरांतील हालचालीचे प्राधान्य व क्रम.

 शरीर हा पदार्थ पार्थिव असल्याचा मागें कफाचे वर्णनांत उल्लेख केलाच आहे व असल्या पार्थिव हाणजे जडस्वरूपी पदार्थाची वाढ व क्रियाकारिता याला सर्वस्वी गति है मुख्य कारण आहे. जरि शरीर हैं पार्थिव आहे तरी त्याच्या वृद्विक्षयात्मक स्वरूपाच्या आणि नित्यप्रवर्तित अशा कार्यकारितेला अवश्य इतका त्यामध्यें आकाशाचा भाग अथवा अवकाश असून हा अवकाश ह्मणजे केवळ पोकळी नाहीं तर त्यामध्यें विरल परमाणुसमुदायस्वरूपी वायु भरलेला आहे. पार्थि--