पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/८५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७२
आयुर्वेदांतील मूलतत्वें.

 येतें. विचारांचा अतिरेक होऊन सर्व इंद्रियांत जोराची चळवळ चालू झाली म्हणजे एके जागी बसणें अशक्य होऊन माणूस येरझारा घालूं लागतो. प्रश्नात्मक भावना उत्पन्न होतात. मान व चेहरा यांमध्ये प्रश्नचिन्हाकृति लंबगोल आकार सहज येतो. रागावतांच मुठी वळणें, पाय आपटणें, आदरभावनेंत छातीवर हात ठेवणें, इत्यादि हालचालींचे मुळाशी मनोभावात्मकता असते व यावरून सिद्ध होतें कीं, मनाच्या भावना निरनिराळ्या शरीरभागांवर परिणामकारक होतात. याहूनहि सूक्ष्म पण सर्व शरीरव्यापी असा मनाचा शरीरावरील परिणाम म्हणजे रसाभिसरणावर होणारा होय. शीतस्पर्शाचे अभावी भेसुर कल्पना, विचार स्मरण, यांनी शरीर रोमांचित होणे, याचे कारण मनाशिवाय दुसरे कोणते? खाद्य पदार्थांच्या दर्शनानें, स्मरणानें तोंडाला पाणी सुटणे, हा प्रभाव मनाशिवाय दुसऱ्याचा नाहीं. सात्विक आनंदाने सर्व शरीरांतील सूक्ष्म घटक ज्यावेळी प्रसन्न झालेले असतात, त्यावेळी स्वाभाविकपणेच विकास पावलेल्या स्रोतसांतून शांतपणे आणि उत्तम रितीने रक्ताचें अभिसरण होतें. आणि त्याचा परिणाम प्रसन्न आणि स्निग्ध मुद्रा दिसते. याच आनंदांत विशिष्ट भावनांचे प्राबल्य असतां, वैषयिक प्रेमाचा संबंध असतां, किंचित् उत्तेजनाचा परिणाम रसरक्तांची गति वाढवितो. त्यामुळे या प्रसन्नतेमध्यें कांहीं तरि मोहक कां होईना पण अस्वाभाविकता येतेच. यावेळीं प्रसन्नता ( चेहऱ्याची) निर्विकार असत नाही. तीमध्ये कांहींशी आरक्तता असते. आणि ज्यावेळी क्रोध येतो त्यावेळी इतकें उत्तेजन मिळतें कीं, जोरानें फेकल्या जाणाऱ्या रक्ताची स्पष्ट रक्तिमा त्वचेच्या पृष्ठभागावर दिसते. या मनोभावनांनीं घडून येणाऱ्या परिणामांचा शरिराचे व्यापारांवर फार परिणाम होतो. विमनस्क स्थितींत अनुत्तेजित व संकुचित स्रोतसांतून पचनेंद्रियांत पाचक रसांचा स्राव होत नाहीं. सर्व शरिराच्या पोषणाचा मुख्य आधार जें रक्त त्याचे अभिसरणांत विघ्न आल्याने पोपणांत व्यत्यय येतो. अशा रितीने मन हैं इंद्रियांचे प्रवर्तक असल्याचे उघड होते. तथापि मनाचा शरिरावर जो परिणाम घडतो, त्याचा क्रम मात्र पूर्वीप्रमाणेच ह्मणजे प्रथम विरलाणुस्वरूपी वायु, त्यानंतर त्याचा आश्रय असा स्रोतःसमुदाय व त्यानंतर या समुदायाचा बनलेला अवयव व मग दुसरा अवयव याप्रमाणे या मनःप्रेरणेचाहि परिणाम शरिरावर घडत असतो. या स्त्रोतःसमुदायस्वरूपी अवयवाचा जो संकोचविकासात्मक व्यापार त्याचे स्पष्ट व दृश्य स्वरूप ह्मणजेच त्या त्या शरीरावयवांचे कार्य समजावयाचे व ह्मणूनच शरिरांतील सर्व क्रियामात्रांचा आद्य प्रवर्तक सूक्ष्माणुस्वरूपी आणि गतिमान् वायु होय. अगदी स्वस्थ बसलेल्या मनुष्याचे शरिरांतहि निरंतर उलाढाल, घडामोड चालू असते. प्रत्ये-