पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/९

हे पान प्रमाणित केलेले आहे.



(६)

रूनच व्यवहार केला आहे, त्या अर्थी प्राचीन आयुर्वेदप्रवर्तकांना त्यांचा निदानचिकित्सेंत नित्य व्यवहार अपेक्षित होता ही गोष्ट उघड होते. व त्रिदोषांची तीच व्याख्या निश्चित ठरेल की जी, स्वस्थशरीरविज्ञान, रोगविज्ञान, व उपचारविज्ञान यांना उपयोगी पडेल. उपलब्ध वाङ्मयाच्या आधारें अशा प्रकारची त्रिदोषांची कल्पना निश्चित होऊन ती शास्त्रीय व्यवहाराला पुरी पडते असें ठरल्यास मग विद्यमान इतर वैद्यकशास्त्रांशी जुळते की नाहीं येवढाच विचार करावयाचा आणि प्रस्तुत निबंध हा याच उद्देशाने लिहिला आहे.
 आयुर्वेदाच्या वाड्मयाकडे अगदी सहज पाहणारालाहि सहज एक गोष्ट दिसते ती ही की, आधुनिक पाश्चात्य वैद्यकाइतकें विस्तृत वर्णन त्यांत नाही. परंतु याचे कारण एक असे की मुद्रणकलेची हल्लींची सुलभता प्राचीन काळी नव्हती आणि दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे प्राचीनांची सूत्रमय विवेचन पद्धति, एकदां विशिष्ट प्रकारची परिभाषा निश्चित करून मग सर्व विवेचन त्या परिभाषेच्या मर्यादेत करावयाचें ही सर्व पौर्वात्य शास्त्रांची पद्धति आयुर्वेदानेंहि स्वीकारलेली आहे. यामुळे भाषाबाहुल्य नसलें तरी त्यांत अर्थकार्पण्य असत नाही. हे पौर्वात्य शास्त्राचे परिचिताना सहज कळेल.
 दुसरी आयुर्वेदात दिसणारी उणीव म्हणजे प्रत्यक्ष शारिरवर्णनाचा संक्षिप्तपणा ही होय. आणि उपलब्ध वाङ्मयावरून तरी ही उणीव आहे ही गोष्ट खरी.मात्र ही उणीव शास्त्रीयत्वाला बाधक हाणारी नाही. प्रथमदर्शनी हें म्हणणे कसेंसेंच वाटेल. चिकित्साशास्त्राच्या परिचितांना माहीत असेल की स्थूल शरीराचा सूक्ष्म परीचय शस्त्रचिकित्सेला जितका अवश्य तितका औषधीचिकित्सेला नाही. औषधांचा परिणाम स्थूल शरीरावर होत नसून स्थूलांतील सूक्ष्म पदार्थावर घडतो. यासाठी या सूक्ष्म भागांचा परीचय औषधि चिकित्सेला अधिक पाहिजे. आयुर्वेदामध्ये शस्त्रचिकित्सेचा प्राचीन काळी किती विकास झाला होता हा प्रश्न निराळा. पण उपलब्ध वाङमय तरी त्या दृष्टीने अर्वाचीन शोधाच्या मानानें अपुरे आहे खास. आणि सूक्ष्म शारीर किंवा इंद्रिय विभागांचे सूक्ष्म ज्ञान आयुर्वेदाला तितकेंच उत्तम प्रतीचे होते. दृश्य पदार्थाची मोजदाद करण्याला शास्त्रीय दृष्टीची फारशी आवश्यकताहि नाही. ते दृश्यच असते-खरे शास्त्र म्हणजे अनुभवसिद्ध तर्क होय. निश्चित