पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/९०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७७
वायूची विशिष्ट स्थानांतील कार्य.

 कार्य आहे. असें असल्याने संयुक्तार्थबोधक पिंड हा शब्द वायूला योजणे चुकीचे होईल. ह्मणून वायू म्हणजे विरल व अखंडगतिमान् असे अणु होत असेच त्याचें वर्णन युक्तियुक्त होईल. यापुढे निरनिराळ्या स्थानांतील वायूच्या क्रियांचा विचार करावयाचाः -

__________
वायूची विशिष्ट स्थानांतील कायें.


 पक्वाशय: -- पक्वाशय ही एक लवचीक कातडयाची पिशवी आहे. मोठे आतडें या नांवानें त्याचा उल्लेख केला जातो. याचा अंतर्बाह्य असा सर्व भाग वातवाहक सूक्ष्मस्त्रोतसें आणि ज्ञानतंतु यांनीं व्यापलेला असतो. शिवाय या आंतड्यांचे मोठ्या पोकळीतही वायु भरलेला असतोच. या आंतड्यामध्ये अशाप्रकारचा एक रचनाविशेष आहे कीं, अन्नपचनाचे कांहीं विशिष्ट संस्कार लहान आतड्यांत अन्नावर घडून मलरूप पावणारे अन्न या आतड्यांत उतरते. लहान आंतड्याचे शेवटच्या ( पोटाचे उजवे बाजूस असलेल्या ) टोकाला या मोठ्या आतड्यांचे टोंक मिळालेले असून तेथून वरचे बाजूनें वळून पोटाचे डाव्या बाजूने हैं आंतडे साली वळून गुदद्वाराकडे जाते. या रचनेमुळे या आंतड्यांत जो मलरूप अन्नाचा अंश पडतो, तो वरचे बाजूला आकर्षिला जाणे अवश्य असतें. सरळ मार्गानें गुदद्वाराकडे जाण्याला गति असत नाही. मळाचे वजन सर्व जठरावर सारख्या प्रमाणांत पडावें अशा प्रकारची ही योजना आहे. पण ह्या सोईमुळेच मळाचे ऊर्ध्वगमन होईल अशी ह्या आंतड्यांची आकुंचनशक्ति किंवा संकोचशक्ति अवश्य ठरते. आणि पक्वाशयामध्ये अशाप्रकारची शक्ति आहे म्हणूनच त्याचे कार्य व्यवस्थित चालते, पच्यमानाशय किंवा लघ्वंत्र यांतून मळाचे उत्सर्जन पक्वाशयांत झालें कीं, ह्या मळाचे स्पर्शाने तेथील ज्ञानवाहक अथवा संवेदनावाहक स्रोतसांवर त्याचा परिणाम होतो. व त्यांची हालचाल वातवाही स्रोतसांना गति देते. या स्त्रोतसांत गति उत्पन्न झाली कीं, असल्याच स्रोतसांचा ज्यामध्ये समावेश झालेला आहे अशा पक्वाशयाची हालचाल सुरू होते. पक्वाशय ही सरळ पिशवी नसून अनेक वळकट्या -आंठ्या -असलेला असा आहे. मलाचे आघाताने प्रथम एका वळकटीवर परिणाम होऊन ती दुसरीला उत्तेजित करते. पहिलीमध्ये आलेला मळ तिचे संकोचानें पुढं ढकलला जातो, पुन्हां तेथे अशीच क्रिया घडते व अशा रीतीनें पक्वाशयाच्या शेवटच्या टोकाला सर्व मळाचा संचय होतो. हैं टोंक इतर भागांहून कमी संवेदनेचें असतें. ह्यामुळे इतर भागांमध्ये थोडयाशा मळाच्या वजनानें - आघातानें- जी संवेदना उत्पन्न होते, ती या भागांत