पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/९१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७८
आयुर्वेदांतील मूलतत्वें.

 हात नाहीं. या ठिकाणी बराच मळ संचित झाला ( एक दिवसाचे आहाराचा मळ सांठवावा इतकी शक्ति, यामध्यें निरोगी अवस्थेत असावी अशी निसर्गाची योजना आहे.) कीं, त्याचें वजन यामध्ये संवेदना उत्पन्न करते. शिवाय याच वेळीं पक्वाशयाचे पोकळीत जो नेहमी भरून राहणारा वायु त्याचे संचारांत या मळाने त्याची जागा अडविल्यामुळे व्यत्यय येऊन असल्या अडणाऱ्या पक्वाशयांतील वायूचाही या मळावर एक प्रकारे उत्सर्जक दाब पडतो. व अशा रीतीनें या संचित मळाचे उत्सर्जनाचा कार्यक्रम सुरू होतो. पक्वाशयाचे जे हें चलनवलन व कार्य, त्याचे कर्तृत्व वायूकडे अशा प्रकारें असतें. पक्वाशयाचे त्वचेत असणा-या संवेदनावाहक स्रोतसांना मळाचे आघातानें गति मिळाली तरि त्याच पक्वाशयाचे त्वचेत असणाऱ्या वातवाहक स्रोतसांतील हवेची हालचाल न होईल तर प्रथम आरंभींचे टोकानें संकोच मूलक मलसंग्रह आणि शेवटचे टोकाने विकासमूलक मलोत्सर्जन व्हावयाचें नाहीं. सर्व शरीरांत अधिक मळ सांठविण्याचें स्थान मलाशय असतें. व इतका मळ बाहेर फेंकून देण्याला उत्सर्जक सामर्थ्य हे तितकेंच असावयास पाहिजे. व या आधिक्यावरूनच वातस्थानांमध्ये पक्वाशयाला मुख्य मानले आहे.

२ कटी - श्रोणिमंडल.


 कटी - कमर किंवा श्रोणिमंडळ - हें वायूचें दुसरें स्थान आहे. नितंवास्थि, (व त्यांचाच भाग जघनास्थि ) व त्रिकास्थि यांच्या संधीनें श्रोणिमंडळ तयार झालेले असून पोटांतील अनेक अवयव याचे आधारे राहतात. श्रोणिमंडळामध्ये जी पोकळी असते, तींत वायू असून त्याचे हालचालीनें, बस्ति, (मूत्राशय, गर्भाशय, मूत्रपिंड, शुक्रवाहिनी यांवर परिणाम होतो. आणि त्यांची कार्ये घडून येतात. शिवाय ह्याच भागांतील वायूचा खालील पायांचे स्नायूंवरहि थोडा फार परिणाम होतो.
 अपान वायू म्हणून ज्याचा उल्लेख केला आहे, तो हाच वायु होय. याचे थोडक्यांत वर्णन करावयाचे म्हणजे, श्रोणिमंडळांतील हालचाल करणारा, इतकेच करतां येईल. याचे विकृतीने अधोभागांतील मल, मूत्र, शुक्र, गर्भ, आर्तव यांचे उत्सर्जनामध्ये विकृति उत्पन्न होते. पक्वाशयांतील वायु फक्त मळाचे एका टोकानें आकर्षण करून दुसन्या शेवटच्या टोकांत त्याचा संग्रह करतो. उत्सर्जनाचे कार्य कटीमधील असल्या प्रकारच्या वायूनें होतें.
 ३ तिसरें वातस्थान:-- सक्थि दोनहि पाय व हात, अर्थात् यांतील स्नायु हे होत. स्नायु जरी जाड दोरे असले तरी त्यांमध्येहि असंख्य छिद्रे आहेत. व ह्या छिद्रिांत हवा किंवा वायु आहे. स्नायूंचे मदतीनें हातपायांच्या क्रिया घडतात म्हणजे त्यांतील वायूमुळे घडतात.