पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/९२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लो. टिळक ग्रंथसंग्रहालय, वाई
७९
वायूची विशिष्ट स्थानांतील कायें.

 हवेनेंच या स्नायूंची स्रोतसे भरलेलीं आहेत. त्यांत आर्द्रता - स्निग्धता कमी. यामुळेच त्यांना हालचाल करण्याचें सामर्थ्य अधिक आहे यांमध्ये कांहीं कारणाने अभिष्यंद-ओलसरपणा - सूज आली म्हणजे त्यांची कार्ये विकृत होतात.
 ४ चवथें वातस्थान-श्रोत्रेंद्रिय-कान हैं होय. कानांतील हवेमुळेच बाहेरील अत्यंत सूक्ष्म शब्दलहरींचा परिणाम श्रोत्रेंद्रियावर होतो. कानांतील शब्दग्राहक असा इंद्रियाचा भाग जोपर्यंत सूक्ष्म असतो तोपर्यंत त्यावर शब्दाचा आघात होतो. ही विरलता वायूमुळे राहते. म्हणून हे वातस्थान सांगितले आहे.
 ५ अस्थि — हांडें: — हें पांचवें वातस्थान होय. अस्थि कठीण आणि छिद्रमय असल्यानें तें वायूचें स्थान सांगितलें आहे. अस्थीमध्ये विशिष्ट प्रकारचें काठिन्य असल्यामुळेच त्या देहधारणाला समर्थ असतात, त्यांत मार्दव किंवा स्निग्धता येईल तर शरीराचे वजन त्यांना सहन होणार नाहीं हें काठिन्य वायूचे रुक्ष--शोषणात्मक - गुणानें येतें. हें काठिन्यहि अर्थातच मर्यादित प्रमाणांतच असावयास पाहिजे हे उघड आहे. पण तें राखण्याचे कार्य वायूचे नित्य साहचर्यानें होतें हेंहि तितकेंच खरे आहे. शरीरांतील हार्डे घन आणि स्थूल आहेत. त्यांमध्यें जर योग्य प्रमाणांत छिद्रे नसतील तर त्यांची वृद्धिक्षयात्मक क्रिया, व संवेदना होण्याला साधन न राहतां त्यांत जिवंतपणाचे कार्य जें, वृद्धिक्षयाचे सातत्य तें चाललें नसतें. अशासाठीं स्थूल स्वरूपाच्या अस्थीमध्ये तितक्याच प्रमाणांत सूक्ष्म वायूची योजना केलेली आहे. अस्थींची रचनाच अशी नमुनेदार आहे. त्यांचा आंतील भाग मज्जेनें भरलेला वरील बाहेरील भाग मांसपेशींनीं आच्छादलेला व मेदानें लपेटलेला असा आहे. ह्मणजे अस्थि जितक्या स्निग्ध तितक्याच कठीण व जितक्या जड, स्थूल तितक्याच सूक्ष्म च्छिद्रांनीं व्याप्त आहेत. ही सच्छिद्रता कमी झाली असतां अत्यंत जड असा शरीरांतील हा हाडांचा सांगाडा शरीराला भारभूत होईल, तसें न होतां उलट शरीराचा भार वाहण्याइतकें लाघव त्यांत छिद्रे व या छिद्रांत वायूची योजना करून विधात्याने ठेवले आहे. अस्थीत वायु असतो हे विधान प्रथमारंभी कसेसेच वाटण्याचा संभव आहे. पण वरील गोष्टी ध्यानी घेतां त्याची यथार्थता पटेल. आरंभीच सांगितलें आहे की, परस्पर विरोधि पदाथांच्या साहचर्यावरच सृष्ट पदार्थांची योजना आहे.
 एकमेकांना मर्यादित करीत योग्य ते उपयुक्त कार्य या साहचर्यांत घडते. अस्थीमध्ये याचा अनुभव येतो. अस्थि कठीण आहेत, पण त्यातहि वाढ व क्षय होतच असतात. अर्थातच ह्यासाठीहि त्यामध्ये एक प्रकारची संवेदना व सच्छिद्रता पाहिजे हे उघड होते. ह्रीं कार्य