पान:आयुर्वेदांतील मूलतत्त्वें अथवा त्रिदोष.pdf/९७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८४
आयुर्वेदातील मूलतत्वें.

 - सर्व लध्वंत्रांमध्ये संचार करतो व अन्नाचें ग्रहण करितो, पचवितो, सारकिटांचे विवेचन-पृथक्करण- करतो. आणि त्यांचे उत्सर्जन करतो. ( अ० हृ० ) आमाशय किंवा अन्नाशय यांतून आंतड्यांत अन्न उतरल्यावर त्यांमध्ये एक प्रकारची हालचाल उत्पन्न होऊन तीमुळे ह्या आंतड्यांतील पित्ताचा - पाचक रसाचा स्त्राव अन्नांत होतो. व अन्नाचें पचन होऊन त्यांतील सारभाग व मलभाग यांचें पृथक्करण होऊन त्यांचे योग्य मार्गाने उत्सर्जन होतें. या क्रिया स्वाभाविक क्रियेनें आंतड्यांत घडत असतात. तथापि या सर्व क्रियांनां आद्यप्रवर्तक अन्नांतील गति - हालचाल - हेंच मुख्य साधन असतें. कोणत्याहि शरीरभागांतील गति ही वायूमुळे असते याचा खुलासा आरंभींच केला आहे. अर्थातच आंतड्यांतील ही गति वायूची आहे हें उघड होतें. जर आंतड्यांचे चलन-वलन कमी झाले तर पाचक पित्ताचा पुरेसा स्राव होणार नाही. आणि सार ह्मणजे अन्नरस आणि किट्ट ह्मणजे मलमूत्र यांचे वियोजनहि नीट होणार नाहीं. अशा प्रकारचें या स्थानांतील वायूचें प्राधान्य आहे.
 पांचवा अपान वायु याचा उल्लेख मागें कटी किंवा श्रोणिमंडळ या स्थानांतील वायूचे वर्णनांत केला आहेच.
 अशा प्रकारे सर्व शरीरांतील वायूची मुख्य स्थाने आणि कार्ये आहेत. कोणत्याहि शरीरविभागांतील लहान मोठ्या हालचालींचे कर्तृत्व या वायूकडे आहे असा स्वाभाविकपणेच या वर्णनावरून निष्कर्ष निघतो. कोणत्याहि शरीरव्यापाराचें वर्णन करावयाचें असतां त्याचे स्वरूपानुसार कांहीं तरि गति अथवा चलनवलनात्मक व्यापारापासूनच सुरवात होते. गतिरहित असा शरीराचा भाग निष्क्रिय इतकेंच नाहीं पण निर्जीव असला पाहिजे. त्या भागांत ही गति कोठून उत्पन्न होते ? याचें उत्तर त्या भागांतील सूक्ष्म अशा छिद्रांचे आश्रयाने राहणारी जी विरलता, वायु अथवा हवा तीपासून उत्पन्न होते असेच मिळणार. शरीराच्या घटनेमध्ये अशाच प्रकारची योजना निसर्गानें केली आहे की कोणत्याहि ठिकाणी या वायूचें वास्तव्य असावेंच. शरीरोत्पत्तीबरोबर असून नित्याचे पोषकांतून स्वसंवर्धक असे सजातीय पदार्थ घेऊन हा वायु आपले कार्य करीत असतो आयुर्वेदयांनी या असल्या शरीरांतील मुख्य तत्वाला गत्यर्थक ' वा ' धातूपासून अन्वर्थक 'वायु' नांव दिले. आणि ह्या नांवानें त्याचा बोध ज्याने नीट होऊ शकेल अशा प्रकारचेंः—

' तत्र रूक्षो लघुः शीतः खरः सूक्ष्मश्चलोऽनिलः । '

 असे वर्णन केलें आहे. त्यांत अयथार्थता कोठें दिसते ? ज्याप्रमाणें एकाद्या कौशल्यपूर्ण यंत्रामध्ये कांहीं पदार्थांच्या रासायनिक मिश्रणापासून