पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१७६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६९

 वेळाची काटकसर करून किती काम करितां येतें तें आश्चर्य- कारक आहे. इराणच्या राजाच्या खुर्चीच्या मागें तिष्ठत उभा असतांना नेहेमियाला दयारूप जो सिंहासनस्थ ईश्वर त्याचा धांवा करितां आला व तो सफल झाला.
 आपला वेळ कितीही शहाणपणानें व चांगल्या रीतीनें भरून काढिला, तरी पुष्कळ भाग्यवान् माणसांच्याही बऱ्याच गोष्टी करावयाच्या रहातील, पुष्कळ वाचनार्ह ग्रंथ वाचण्याचे रहातील, पुष्कळ प्रेक्षणीय वस्तु व अनेक देश पाहण्याचे रहातील.
 ह्या संसारांत सुख होण्याचें व यश मिळण्याचें मोठें तत्व- मुख्य ह्यटलें तरी चालेल - ह्मणजे प्रामाणिकपणानें उपयोगी पडेल असें काम करण्याची शक्ति अंगी असणें हें होय. सिसेरो ह्मणे जें अवश्य पाहिजे तें धारिष्ट कार्यारंभीं धारिष्ट हवें, कार्य चालू असतां धारिष्ट हवें, कार्याच्या शेवटीं धारिष्ट हवें. काम करूं असा विश्वास अंगीं असणें उपयोगी आहे. पण सर्व ठिकाणीं जें अंगीं पाहिजे तें, नेटानें उद्योग करणें होय, असें ह्मणणें विशेष सयुक्तिक दिसतें. ज्याप्रमाणें संसाराचें पर्यवसान खेळण्यांत नाहीं त्याप्रमाणें उद्योगांतही नाहीं. दोन्हीं एकाच परिणामाकडे ने- णारी साधनें होत.

 मनाच्या शांतीस ज्याप्रमाणें काम करणें जरूर आहे त्याचप्रमाणें शरीरसंपत्तीस जरूर आहे. चिंतेंत घालविलेला एक दिवस काम करण्यांत घालविलेल्या आठ दिवसांपेक्षां जास्त थकवा आणितो. चिंतेनें शरीराची अंतस्थ स्थिति बिघडते, कामानें ती निरोगी व व्यवस्थित रहाते. स्नायूंस व्यायाम झाला ह्मणजे शरीर निरोगी रहातें, व मेंदूस व्यायाम झाला ह्मणजे मन शांत होतें. मानसिक श्रमामुळें अंतःकरण स्थिर होतें .


 १ जानकोर्ट.
 १५