पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१८९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भाग १४.
श्रद्धा.

 देशस्थितिविषयक पुस्तकांत असें सांगितलें आहे कीं, एक अब्ज ५० कोटी मनुष्यसंख्येपैकीं, ४० कोटी लोक बुद्ध धर्माचे आहेत; ३५ कोटी लोक ख्रिस्ती आहेत; २० कोटी हिंदु व १५ कोटी मुसलमान आहेत. परंतु सेल्डननें असें ह्यटलें आहे, - जरी तो फार पलीकडे जातो तरी तें सत्याच्या जवळजवळ येतेंच, :—“तंटेभांडणें मोडण्याकरितां बरेच लोक आपण एकाच धर्माचे आहोंत असें ह्मणत असतात. पण जर विशेष बारकाईनें शोध केला तर सर्व मुद्यांविषयीं एकच धर्ममत कबूल करणारे तीन लोक देखील कोठेही क्वचितच सांपडतील." व असें व्हावें ह्यांत आश्चर्य नाहीं. कारण, खरें पाहिलें असतां ह्या जगाबद्दल देखील आपणास इतकी थोडी माहिती असते, तेव्हां दुसऱ्या जगाविषयीं विशेष माहिती असावी असें मानावयासच नको.

 लिडन पाद्री ह्मणतो: “ह्या आश्चर्यकारक जगांत आपल्या जीविताची ही पायरी आपण चढत आहोंत-मग श्रद्धेमुळे स्वर्ग माणसाच्या डोळ्यांपुढे खेळो वा न खेळो. हें जग पुष्कळ भव्य गूढांचें एक आलय आहे. उद्यां कदाचित् तुह्मी गांवांत सहल करावयास जाल; क्वचित् ठिकाणीं उकलणाऱ्या कळ्या अथवा उघडणाऱ्या पानांचा तो हिरवाचार रंग, हीं पाहून तुह्मांला लागलेंच स्मरण होईल कीं, वसंतऋतु आपल्या वार्षिक विजयो-


 १ टेबल टॉक.