पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लोक आपल्या बाहुवीर्याच्या, विद्वत्तेच्या, कदाचित् आपल्या श्रेष्ठ राजनीतीच्या जोरावर सत्ताधीश होऊन बसले. व त्यांनी इंग्रजी शिकण्याच्या शाळा घातल्या. त्यांचा आमच्याशीं व्यापारनिमित्तानें संबंध झाला तेव्हांपासूनच पूर्वी निर्दिष्ट केलेली अदला- बदलीची क्रिया सुरू झाली होती. पण, इंग्रजी भाषा शिकवि- ण्याच्या शाळा सुरू झाल्याबरोबर त्या क्रियेस मोठें प्रोत्साहन मिळालें, व ह्या अदलाबदलीस जोर आला. आरंभी लोक फक्त पोषाखपेहरावाच्या, खाण्यापिण्याच्या पदार्थास लुब्ध होऊन त्यांचेंच अनुकरण करण्यांत सुख मानूं लागले. बिस्कुटें खाणें, चहा पिणें, पाटलोनी घालणें ह्यांत त्या वेळीं नवीनपणा होता. असला प्रकार कांहीं वेळ चालल्यावर आचारविचार, रीति- रिवाज इत्यादींचें द्वंद्व होऊं लागलें. त्यांत बरेच रीतिरिवाज आह्मीं घेतले आहेत, ह्यांत संशय नाहीं. आचारविचारांचें द्वंद्व आजकाल चाललेंच आहे. त्यांचा निकाल काय लागेल हैं निश्चयानें सांगणें कठीण झाले आहे. पोषाखपेहराव, खाणें पिणें, इत्यादींवर राष्ट्राचें राष्ट्र ह्या नात्यानें असणारें जीवित अवलंबून नसतें. राष्ट्राचें जीवित आचारविचार, धर्म, इत्यादींवर सर्वस्वी अवलंबून असतें. तेव्हां आजकालचा प्रश्न केवळ जिवाशीं आलेला आहे. आचारविचारांत प्राच्य व पाश्चात्य असे मोठे विभाग पडले आहेत. इतर साऱ्या गोष्टींत कदाचित् पाश्चात्य आपल्या नूतनत्वाच्या जोरावर प्राच्यांचा पाडाव करितील. पण, आचार- विचार व धर्म ह्या बाबतींत कसें व्हावें हा प्रश्न आहे. कारण आर्य जुन्या धर्ममतांचे कट्टे अभिमानी आहेत. राज्यक्रांतीचे अनेक प्रसंग जरी येऊन गेले तरी त्यांनीं आपला सनातन धर्म सोडिला नाहीं. तेव्हां ह्या बाबतींत प्राच्य व पाश्चात्य ह्यांचें मोठें झुंज होणार ह्यांत संशय नाहीं; व त्या रणसंग्रामाचा आरंभ