पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/138

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आदिवासी महिलांची शैक्षणिक स्थिती

आदिवासी क्षेत्राचे शैक्षणिकदृष्ट्या वेगळेपण :

 आदिवासी क्षेत्रातील सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या वेगळेपण पाहताक्षणी डोळ्यात भरते. आदिवासी क्षेत्रात अद्यापही पाहिजे तसे अपेक्षित शैक्षणिक वातावरण आपण निर्माण करू शकलो नाही. नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण करण्याबाबत फार पूर्वीच सांगितले होते. वेगवेगळ्या चौकशी समित्यांनी आपल्या अहवालात प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावण्याबाबतही भर दिला होता. तरी अद्यापही आदिवासी आणि ग्रामीण भागात प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण आणि दर्जेदार प्राथमिक शिक्षण सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.

 आदिवासी जीवनाचे अवलोकन केले तर शिक्षणाच्या मागासलेपणामुळे जगणे आणि शिकणे यांचा काही संबंध असतो हेच आदिवासींच्या मागच्या पीढीला उलगडले नाही. आपण जसे कसे बसे जगलो तशीच मुलेही शिक्षणावाचून जगू शकतील अशीच त्यांची अजूनही समजूत आहे. त्यामुळे स्वातंत्र्योत्तर प्रदीर्घ कालखंड उलटूनही आदिवासींचे दारिद्रय हटले नाही. व्यसनाधिनते पासून ते परावृत्त होऊ शकले नाहीत. अज्ञान, अनारोग्य, बेरोजगारी, कुपोषण, महागाई आणि शोषण यांनी त्यांना पुरते ग्रासले आहे. मुलांना शिकविण्यापेक्षा लहानपणीच कामाला लावून त्यांचा विवाह केला म्हणजे या पालकांची जबाबदारी संपते. दारुची सवय मुलांना लावण्यातही आपले काही चुकले असे त्यांना वाटत नाही. त्यातच पुन्हा भर म्हणून विज्ञाननिष्ठेचा अभाव आणि अंधश्रध्देचा प्रभाव सर्वत्र दिसून येतो.

 मुला-मुलींची अल्पवयातील कमाई आदिवासींना चालते पण विनामूल्य मिळणाऱ्या शिक्षणात गुंतलेली मुले त्यांना भार वाटतात. कारण शेतीकामात, घरकामात, रोजी कमाईत या मुलांची मदत होत नाही. धाकट्या भावंडांना सांभाळायला, गुरे वळायला ते आपली मुले वापरतात. त्यांना काही पर्याय दिसत नाही. पुढे निसर्गाच्या सानिध्यात वाढलेली ही मुले लहानपणापासूनच स्वच्छंदी,साहसी आणि भटकी बनतात. त्यांना शिक्षण ही एक निरर्थक व कंटाळवाणी

१३८