पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/57

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 , संबळ, तुतारी, सूरवाद्य यांच्या सुरात आणि तालात ही सगळी सोंग नाचतात.प्रत्येक सोंगाची नाचण्याची पध्दत वेगळी असते. प्रत्येक देवाची नाचण्याची पध्दत ठरलेली असते. एकमेकांचे बोहाडे पाहूनच हे नाचांचे अनुकरण होते. वाजवणारे तेच असतात. परंतु प्रत्येक सांगानुसार त्यांचे तालसूर ते वेगवेगळे धरतात. प्रत्येकाच्या घरात परंपरा आहे. त्यानुसार त्या त्या घराण्यात ते ते सोंग चालत येते. वर्षभर बांधून ठेवलेले हे सोंग होळी आली की बाहेर काढतात. त्याला रंगरंगोटी करतात. आठवडाभर ती सोंग येणारे जाणारे पाहतात. एरवी वर्षभर ही सोंग आपापल्याघरात बांधून ठेवलेली असतात. भाड्याने सोंग एकमेकांना दिली जातात. देवादिकांची ही सोंग कागद, पाणी एका टिपाडात टाकून आठ दिवस तो लगदा कुजवायचा नंतर त्यात डीग टाकायचा, उखळातून तो कांडून घ्यायचा. मग सोंग घडविणारा सोंग तयार करतो. आदिवासींच्या जाती आणि उपजाती वारली, ढोर कोळी, मल्हार कोळी, कातकरी, 'क' ठाकूर, 'म' ठाकूर, महादेव कोळी इत्यादी असल्या तरी त्यांची सोंग सारखीच असतात. बायका या सोंगात प्रेक्षकांची भूमिका बजावतात. त्या प्रत्यक्ष सोंग घेत नाहीत. पुरुषानेच सोंग फक्तनाचवायची ही प्रथा आहे. अलिकडे अपवाद म्हणून एखादी स्त्री ही सोंग नाचवितांना दिसते. रांजण पाड्यावर हे आढळले.

 झगा, फेटा, गदा, तलवारी,लेहंगा, चाळ पुंगरू ही वेषभूषा या सोंगाना लागते. शहराच्या गावाहून भरपूर भाडे देऊन हे सामान आणतात. काही पाड्यांवर स्वतःची वेषभूषा तयार असते. तर काही पांड्यावरं विनावेषभूषा नेहमीच्याच कपड्यात सोंग नाचविली जातात. सोंग नाचवणे अमूक एका गोष्टीसाठी अडते. असे नाही. सूट पँट नसली तर अंडरपॅटवरही सोंग नाचविली जातात. दिवसा झोपा काढून रात्रभर जागरण करून सोंग पाहतात. आणि नाचवतातही. त्या निमित्ताने जवळपासचे तसेच लांबचेही नातेवाईक मित्रमंडळी पाहुणे येऊन आपापल्या लोभाच्या ठिकाणी राहतात. त्यांची सगळी व्यवस्था ज्याची तेच पाहतात.

 सुरवातीला एका फळ्यावर सोंगाची नावे लिहून ठेवायची त्याप्रमाणे सार क्रमाने येत होती. पण आता माईक लाऊड स्पीकरवरून सोंगाला बोलावले जाते.

५७