पान:आरोग्यविज्ञान.pdf/५५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५६ हिताची गोष्ट आहे. (२) हिवताप झालेल्या माणसाला मच्छरदा- णींत निजविलें ह्मणजे त्याला चिलटें चावत नाहींत, व इतरांचा तापापासून बचाव होतो. एरव्ही देखील आजारी माणसाच्या संसर्गासंबंधी आपण फार खबरदारी घेतली पाहिजे; ह्मणजे त्याला वाळीत टाकावयाचा असें नव्हे, तर त्यानें वापरलेली भांडी, कपडे नीट धुवून घरांत घ्यावयाचे. सूर्यकिरणांनीं रोगजंतूंचा नाश उत्तम प्रकारें होतो. ह्मणून आपले कपडे व अंथरूण पांघरुणें नेहमीं उन्हांत तापवून झाडून स्वच्छ ठेवावी. अशा प्रकारें प्रकृति जोमदार राखणें, डांस होऊ न देणें, व संसर्गानें रोगजंतूंचा प्रवेश शरीरांत न होईल असें करणें, ह्या सर्व गोष्टींविषयीं शक्य ते प्रयत्न करूनही जर हिवताप आलाच तर त्याला कोयनेल घेणें व वर दूध पिणें हा उपाय आहे. कोयनेल घेण्यापूर्वी रेचक घेणें चांगलें. उत्तम रेचक ह्मणजे एरंडेल तेल. कोयनेल हें गुळवेलीच्या सत्त्वासारखें एका झाडाच्या साली- पासून तयार करितात. त्यांत दुसरे तिसरें कांहीं नाहीं. कोयनेल पोटांत घेतल्यानें हिंवतापाच्या जंतूंचा त्यानें नाश होतो असा अनुभव आहे. ज्या झाडांच्या सालीपासून कोयनेल तयार करितात तीं सिंकोना नांवाचीं झाडें बाहेर देशाहून आणून आसाम, निलगिरी वगैरे ठिकाणीं लावलेलीं आहेत, व सर्वांस तें मुबलक व स्वस्त मिळावें ह्मणून सर्व पोस्टांतून तें विकण्याची सोय सरकारानें केलेली आहे.