पान:आरोग्यशास्त्र.pdf/१५१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अन्न, पेयें व मसाले १४३ चहा अल्प प्रमाणांत घेतल्यास जिवाला सुख वाटतें आणि शारीरिक व मानसिक शक्ति वृद्धिंगत होतात. ह्याचें मेंदूवर उत्तेजक कार्य घडते. उत्तेजक कार्य संपल्यावर ह्याने मद्याप्रमाणें थकवा येत नाहीं. पण हे सुपरिणाम चहा नेहमीं न घेणारालाच होतात. रोज घेणारास असे परिणाम कमी घडतात. सतत चहा अधिक घेण्यानें अग्निमांद्य व मलावरोध हे विकार होतात. शिवाय मेंदूस ग्लानि येऊन, निद्रानाश व कंप अशा भावना होतात. कॉफी कॉफीच्या बियांत लेग्युमिन, स्नेहयुक्त पदार्थ, शर्करा, डेक्स्ट्रिन्, उद्भिज आम्ल व खनिज नमके असतात. ह्यांशिवाय सुवासिक तेल व शेकडा ८ भाग कॅफिन हे अल्कलॉइड व कॅफिओटॅनिक अॅसिड नामक स्तंभक पदार्थ असतो. कॉफी तव्यावर परतल्यानें तिच्यांत वायु उत्पन्न होतो, म्हणून ती फुगते व तिच्या आंगीं एक प्रकारचा सुवास येतो. कॉफी तयार करावयाची असल्यास निची पूड व साखर आणि पाणी भांड्यांत घालून तें चुलीवर कढ येईपर्यंत ठेवावे. पावशेर (२० तोळे ) कॉफी हें पेय तयार करावयाचें असल्यास एक तोळा बियांची पूड घ्यावी. कढ येणार तोंच भांडें चुलीवरून उतरावें. नंतर ती गाळून त्यांत दूध घालून वापरावी. चुलीवर असतांना पाण्यास आधण आल्यास तिचा सुवास कांहीं कमी होतो. पण ती शिजविली तरी चहासारखी बिघडत नाहीं. काफीचें मेंदूवर उत्तेजक कार्य घडते. हृदाची गति, मूत्राचें प्रमाण, चर्माची क्रिया व फुप्फुसाचे द्वारा कॅर्बानिक अॅसिडवायूचे उत्सर्जन हीं कॉफीमुळे वृद्धिंगत होतात. हृदाच्या क्षीणतेंत कॉफीचा उपयोग होतो. हृदाची धडधड असल्यास कॉफी व चहा दोन्ही देऊं नयेत. कॉफीमुळे थकवा व शिणवटा दूर होतो. कॉफीने चहाइतकी भूक कमी होत नाहीं.