पान:आरोग्यशास्त्र.pdf/२६८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२६० आरोग्यशास्त्र घालून खोलीच्या बाहेर नेऊन जाळून किंवा पुरून टाकावें. रोग्यापासून स्पर्शसंचाराची भीति संपल्यावर त्याला साबण लावून स्नान घालावें, त्याचे कपडे पालटावे आणि मग इतर लोकांमध्ये बसूं द्यावें. सांसर्गिक रोग झालेल्या इसमाला डुलीमध्ये घालून किंवा हातगाडींत घालून हास्पिटलमध्यें पोंचवावें. पोलीस चौकीमध्यें अगर सार्वजनिक जागेमध्यें डुली वगैरे ठेवावी. वापरल्यानंतर ती जंतुविरहित करावी. दूषित घरांतील माणसांमध्यें रोग झाल्याचें लवकरच समजावें म्हणून त्यांना पृथक् जागी ठेवतात. ज्या घरांत सांसर्गिक रोग झाला असेल त्यांतील मुलांना शाळेत घेऊं नये व त्यांतील लोकांना कामावर जाऊं देऊं नये. सांसर्गिक रोगाची चौकशी ही चौकशी खालील मुद्यांवर करावी. ( १ ) रोगी:- रोगाच्या आरंभाची तारीख, स्फोट उमटल्याची तारीख, सांप्रतचें व पूर्वीचें पृथक् ठेवणें, संसर्ग होण्याचा संभवनीय मार्ग, स्पर्शसंचारी रोग्यांशी किंवा दूषित पदार्थोंशी अलीकडील संबंध, धंदा, काम करण्याची जागा अथवा शाळा, उद्योगावर गेल्याची शेवटली तारीख. (२) कुटुंबांतील लोक:- चालूं रोगास उन्मुख अशी घरांतील कोणाची प्रकृति आहे कीं काय? हा आजार पूर्वी झाला असल्यास त्याची तारीख. ( ३ ) घरांत कोणता उद्योग चालतो ? (४) दूध व पाणी येण्याचें ठिकाण. (५) घर व आसपासची जागा, त्यांची आरोग्यदृष्ट्या स्थिति. ( ६ ) घर, शेजार, शाळा, अथवा कामाची जागा ह्या ठिकाणी चालूं सांसर्गिक गोष्टीसंबंधी घडलेली हकीगत. मसूरिकेच्या बाबतींत देवी प्रथम व दुसऱ्या वेळीं टोंचल्या किंवा 'नाही ह्याचा शोध करून तारीख टिपून ठेवावी. प्लेगचे बाबतींत उंदीर पडल्या संबंधानें चौकशी करावी.