पान:आरोग्यशास्त्र.pdf/९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
आरोग्यशास्त्र

.

प्रकरण पहिले
पाणी

 पाणी ही जीवनाला अत्यंत जरुरीची वस्तु आहे. त्याशिवाय भूतला- वरील प्राणी व वनस्पती जिवंत राहणार नाहीत. म्हणून जगांतील प्रथमारंभीच्या वसाहती नदीवर झाल्या होत्या. गांवें व खेडीपाडी नद्यांचे, सरोवरांचे व झऱ्यांचे काठी वसली. अलीकडल्या अर्वाचीन काळांत स्वाभाविक रीत्या पाण्याचे ठिकाण असते त्यालगत वस्ती करण्याची जरुरी राहिली नाही. कारण नळ व पाटबंधाऱ्यांचे कामांत हल्ली इतकी गति झाली आहे की, मुंबईसारख्या शहरालासुमारे २० मैल लांबीच्या स्थाना- पासून पाण्याचा पुरवठा होतो.
 पाण्याचे मुख्य उपयोगः-(१) पिण्यासाठी. पाणी पिण्याने अन्नास मऊपणा येऊन तें शोषणपात्र होते, रत्नाचे द्रवत्व कायम राहते आणि त्याज्य पदार्थ द्रवरूप होऊन त्यांचे उत्सर्जन शरीराबाहेर होते. (२) अन्न शिजविण्याचे कामी व धुण्यासाठी. (३) गोठे, तबेले व गाडया वगैरे धुणे. (४) म्युनिसिपॅलिट्या, गिरण्या व कारखाने ह्यांची कामें. (५) रुग्णालयें.
 भूतलावर पडणाऱ्या पावसापासून आपणाला पाणी प्राप्त होते. जमिनीवर पाणी पडल्यानंतर त्याची खाली लिहिल्याप्रमाणे व्यवस्था होते:-(क) कांही भागाचे बाष्पीभवन होऊन तो उडून जातो. (ख) दुसरा भाग जमिनीचे उताराने वाहात जातो. (ग) तिसरा भाग जमिनीच्या रंध्रांतून झिरपून खोल जातो.