पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१००

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

माणसासाठी भगवद्भक्तियोग हा सर्वोत्तम मार्ग आहे यात संदेह नाही. सत्संगतीमुळे मनुष्याच्या ठिकाणी शुद्ध भक्तियोगाविषयी प्रेम विकसित होते व प्रामाणिक आध्यात्मिक गुरू मिळवून तो श्रद्धेने, प्रेमाने आणि भक्तिभावाने चिंतन करतो. यातूनच त्याला निर्विशेष विचारांची परिणती म्हणून परमसत्याचे ज्ञान होते.

  पण आपण करतो काय? तर देवळात जातो, देवाला नमस्कार करतो व मग त्याला विसरून जातो. परंपरेने आली म्हणून पूजा-अर्चा करतो, कृष्णाष्टमी, रामनवमी, गणपतिउत्सव अशा अनेक गोष्टी कर्मकांड म्हणून किंवा पाट्या टाकल्याप्रमाणे किंवा केवळ बदल व चैन म्हणून करतो. हे विसरता कामा नये की राम, कृष्ण, गणेश ही त्या अमूर्त चैतन्याची प्रतीकरूपे आहेत. या धारणा आहेत, त्यामार्गेच ध्यानाने परमसत्याची प्राप्ती होऊ शकते. याचे सोपे साधन म्हणजे प्रार्थना. प्रार्थनेची शक्ती अफाट आहे. आपल्या परंपरेप्रमाणे सकाळी उठल्यावर " कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती" - ह्या श्लोकापासून अगदी झोपेपर्यंत "अस्तिक् अस्तिक् भयं नास्ति" या निरनिराळ्या श्लोक, स्तोत्रे याद्वारा दिवसभराचे काम चालू ठेवूनही भगवंताची आराधना चालू असे. अत्यंत श्रद्धेने हे करणारे लोक अंतर्मनाला सहज जागृत करू शकत असत. त्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्यही उत्तम राहत असे. परंतु आधुनिक शास्त्रांमध्ये प्रार्थनेला काहीही स्थान नाही. त्यापासून काहीही फायदा नाही असे म्हणणे म्हणजेच आधुनिकता असा गैरसमज झाला आहे. प्रार्थना ही सर्व धर्मांत, सर्व जातीत एक अत्यंत धार्मिक बाब म्हणून समजली जात आली आहे. रोगमुक्तीचे हे एक महत्त्वाचे सोपे साधन होऊ शकते. "अन्यथा शरणं नास्ति, त्वमेव शरणं मम । तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वर ।" ह्या प्रार्थनेने संकटकाळीही आपण ईश्वराचा धावा करत असू. स्वतःच सोडा, परंतु आप्त, स्वकीय, मित्र किंबहुना ओळखीच्या व्यक्तीसाठी सुद्धा प्रार्थना करण्याची प्रथा होती. देवळात जाऊन, घरी किंवा देव पाण्यात घालून, स्वतः उपवास करून दुसऱ्याचे हित चिंतणे हे अगदी सामान्य होते. हासुद्धा प्रार्थनेचाच प्रकार. प्रार्थना रोगमुक्तीला व आरोग्यप्राप्तीला किती साहाय्यभूत होते? पूर्वी आपली त्यावर अविचल श्रद्धा होती. पण त्याला आधार शास्त्राचा हवा ही आजची काळाची गरज. पूर्वी आपण ईश्वराकडे धाव घेत होतो तर आता रोगमुक्तीसाठी सतत डॉक्टरांकडे धाव घेतो. डॉक्टर कधीही भगवान होऊ शकत नाही. त्याच्या

९९