पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१०१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शक्ती व ज्ञान अत्यंत सीमित आहेत. तर भगवंताच्या शक्तींना सीमा नाही, यावर आपण श्रद्धा ठेवत होतो. परंतु आज बहुतेक सुशिक्षित लोक याला अडाणीपणा किंवा अंधश्रद्धा म्हणतात. आता या दोन संपूर्ण विरोधी बाजू. यात सत्य काय? ते फक्त विज्ञानाधिष्ठित संशोधनातून कळू शकते ही या युगाची धारणा. पण हे कार्य करणारेही लोक आज आहेत. एकेकाळी पृथ्वी सपाट आहे, सूर्य तिच्याभोवती फिरतो, चंद्र व पृथ्वी यांचा एकमेकांवर काहीही परिणाम होत नाही अशी धार्मिक नेत्यांची कल्पना होती. पण पृथ्वी गोल आहे, ती आपल्याभोवती व त्याचप्रमाणे सूर्याभोवती फिरते. भरती-ओहोटीच्या क्रियेस चंद्राचे आकर्षण कारणीभूत असते. गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवरून वर फेकलेली वा उंच असलेली वस्तू पृथ्वीवर पडते हे ज्ञान अगदी शाळकरी मुलांना आहे. याचे कारण म्हणजे विज्ञान प्रयोगाद्वारे मिळालेले सत्य. हीच रीत प्रार्थनेच्या बाबत लावता येते, हे सिद्ध झाले आहे.
 सॅन्फ्रान्सिस्को जनरल हॉस्पिटलमध्ये कोरोनरी केअर युनिटमध्ये कॉम्प्युटर- प्रमाणित ३९३ रुग्णांवर हा प्रयोग करण्यात आला. यापैकी काही रुग्णांचे बाबत खाजगी व्यक्ती नित्यनेमाने प्रार्थना करत होत्या तर २०१ व्यक्तींचे बाबत कोणीच अशी प्रार्थना करत नव्हते. हा अभ्यास वैद्यकशास्त्रातील अत्यंत कडक नियम लावून करण्यात येत होता. रुग्णांची निवड पूर्ण निर्हेतुकपणे करून ज्याला ‘डबल ब्लाइंड’ रीत म्हणतात त्याप्रमाणे सर्व रुग्णांचे प्रतिसादांची नोंद ठेवली जात होती. यातील रुग्ण, नर्सेस किंवा डॉक्टर्स यांना याची काहीही माहीती नव्हती. ते पूर्ण अंधारात होते. या अभ्यासाचा संचालक बायर्ड (Byrd) याला ही मूळ कल्पना सुचली होती. तो स्वतः हृदयरोगतज्ज्ञच होता. त्याला प्रार्थनेमुळे परमेश्वर काय करतो हे पाहावयाचे होते. त्याने रोमन कॅथॉलिक व प्रोटेस्टंट या दोन्ही पंथांच्या छोट्या छोट्या समूहांना प्रार्थनेची विनंती केली. प्रार्थना करावयाची पण ती काय व कशी हे ज्याचे त्याने ठरवायचे होते. फक्त प्रार्थना नियमित दररोज झाली पाहिजे एवढीच अपेक्षा होती. प्रत्येक पेशंटसाठी ५ ते ७ व्यक्तींचा ग्रुप प्रार्थना करणार होता. या अभ्यासातून निघालेले निष्कर्ष असे:
 (१) ज्यांच्यासाठी कोणीही प्रार्थना करत नव्हते त्यांच्यापेक्षा ज्यांच्यासाठी प्रार्थना होत होती त्यांना तीव्र औषधांची जरुरी पाच पटीने कमी होती.

१००