पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१०२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

   (२) त्यांना पल्मोनरी एडीमा - म्हणजे फुफ्फुसांत पाणी होण्याची शक्यता तिपटीने कमी होती.
  (३) यांच्यापैकी एकालाही कृत्रिम श्वासासाठी घशात ट्यूब बसवून मशिनने श्वासावर नियंत्रण ठेवण्याची जरुरी भासली नाही तर ज्यांच्यासाठी कोणीही प्रार्थना करत नव्हते अशांपैकी १२ रुग्णांना यांत्रिक श्वासोच्छ्वासाची गरज भासली.
  (४) प्रार्थना केली जाणाऱ्या रुग्णांपैकी अपवादात्मक फारच थोड्या लोकांचा मृत्यू झाला. पण कोणी संशोधकाने जर हे यश देणारे औषध शोधून काढले असते तर ते अशक्याचे शक्य करणारे (Break through) यश समजले गेले असते. डॉ. विल्यम नोलान सारखे नास्तिक व या असल्या तथाकथित भाकडकथांवर विश्वास न ठेवणारे व श्रद्धा, प्रार्थना यांची टवाळी करणारे लोकसुद्धा चकित झाले. डॉ. नोलान म्हणतो की, "हे म्हणजे अशक्य गोष्ट शक्य झाल्याचे स्पष्ट उदाहरण आहे. आता आपण आपल्या प्रिस्क्रिप्शनवर 'प्रार्थना-रोज तीन वेळ' असे लिहिण्यास हरकत नाही. त्याचा निश्चित उपयोग होतो हे सत्य आहे."
  या कहाणीचा अर्थ काय लावावयाचा? अत्यंत आधुनिक वैद्यकशास्त्र अजूनही कित्येक गोष्टी जाणत नाही. मनापासून केलेली प्रार्थना ही मनाशी संबंधित आहे व मन वैद्यकशास्त्राला अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सहज घडवू शकते. आणि हे प्रार्थना करणारे लोक काही हॉस्पिटलच्या जवळपासचे नव्हते. काही जण शेकडो मैल दूर होते. जवळचे व दूरचे प्रार्थना करणाऱ्यांच्या सुपरिणामात काही फरक नव्हता. म्हणजे अंतर किती असो परिणाम तोच. त्यामुळे एखादी शक्ती काम करत नाही तर मनच विश्वव्यापी असल्यामुळे त्याला रेडिओ, टी. व्ही. यांच्याप्रमाणे प्रवासासाठी शक्तीची गरज नाही. या यांत्रिक गोष्टींची शक्ती अंतरानुसार कमी कमी होत जाते व शेवटी दूरची यंत्रे या लहरी ग्रहण करण्यास असमर्थ ठरतात.
 येथे असा एक ग्रह प्रचलित आहे की जसे सॅटेलाईटवरून आपण टी.व्ही. च्या प्रतिमा परावर्तित झालेल्या पाहतो तसे आपली प्रार्थना जाणून परमेश्वर आपल्या शक्तीने कार्य करतो. म्हणजे ईश्वरच सॅटेलाईट झाला ही कल्पना हास्यास्पद आहे. ईश्वर हा अमूर्त, सर्वव्यापी व सर्वसाक्षी आहे. त्यामुळे तो हजारो मैलांवरही आहे व हॉस्पिटलमध्येही आहे. आणि या ठिकाणी आपल्याला विज्ञानापेक्षा अध्यात्म

१०१