पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१०६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

किंवा एखादा रुग्ण यांच्यासाठी करावी या प्रश्नाचे उत्तर मात्र या संशोधकांना सापडलेले दिसत नाही. त्यामुळे काही संशोधकांच्या मते आपण निष्काम प्रार्थना करत राहावे व ती शक्तीच कोठे कार्य करावयाचे, कोठे नाही हे ठरवेल. हे मत म्हणजे गीतेतील निष्काम कर्मयोगाचेच रूप आहे का? असावे. एकूण अध्यात्माचाच हा भाग आहे, हे मात्र निश्चित
.   अत्यंत विकसित राष्ट्रे व जेथे वैद्यकशास्त्रातील अनेक विकारांवर संशोधन चालू असते, तेथील उच्चपदस्थ वैद्यकतज्ज्ञांना सुद्धा काही अत्यंत चमत्कारिक, अविश्वसनीय असे अनुभव आलेले आहेत. काही वेळा सरळ सोप्या वाटणाऱ्या विकारांवर उपाय चालू असताना तो रुग्ण काहीही कारण नसताना अचानक मृत्युमुखी पडतो. त्या मृत्यूचे खूप विचार करूनही कारण समजत नाही. तेथील कायद्यात वैद्यकतज्ज्ञाच्या हलगर्जीपणामुळे रुग्णांचे मृत्यू झाल्यास वा भरून न येणारे नुकसान झाल्यास, त्या तज्ज्ञाविरुद्ध कायदेशीर इलाज केला जातो व त्या रुग्णाला वा त्याच्या जवळच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई दिली जाते. अर्थात हे शस्त्र दुधारी आहे. फायदा असा की वैद्यक व्यवसायातील प्रत्येक व्यक्ती अतिशय काळजीपूर्वक उपाययोजना करत असते. पण तोटा असा की याची प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून कोणीही धोका पत्करावयास तयार नसतो. वास्तविक डॉक्टर हा काही ब्रह्मदेव नाही. रोग्याचा प्राण वाचविण्यासाठी अनेक धोके पत्करून उपाययोजना करावी लागते. त्या वेळेस यश देणे वा अपयश मिळणे ही गोष्ट ईश्वरावर सोपवून आपल्या कुवतीप्रमाणे उत्कृष्ट सेवा देणे हे प्रत्येक डॉक्टरचे कर्तव्य असते. तेव्हा खरोखरीच हलगर्जीपणा होत असेल तरच कायदेशीर इलाज योग्य ठरतो. नाहीतर नाही. आज भारतात व्यावसायिकांचा डोळा पैशावर जास्त असतो, निरपेक्ष सेवेवर नाही.

  काहीही कारण नसताना जसे मृत्यू येतात तसे काही वेळा निश्चितपणे मृत्यू यावयाची वेळ आली असताना तो रुग्ण खडखडीत बरा होऊन सामान्य जीवन जगू शकतो. या गोष्टींची उत्तरे बुद्धिवादाने मिळू शकत नाहीत. तेथे निश्चितपणे काहीतरी शक्ती कार्य करत असते. ही शक्ती अध्यात्मामधून मिळू शकते. आपल्या अंतर्मनाची शक्ती अफाट आहे. ती कालातीत, सर्वव्यापी, अतर्क्य अशी आहे. प्रश्न असा की ती मिळविण्याचा मार्ग काय? आपण असे समजतो की व्यक्ती

१०५