पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१०७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

म्हणजे जन्माला आलेला जीव, ज्याचे मृत्यूनंतर काहीही अस्तित्व उरत नाही. चार्वाकाने असे म्हटले होते की " भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः ।” याचा पुढला भाग आपल्या चर्चेचा भाग नाही. याचा अर्थ असा की, मृत्यूनंतर ती व्यक्ती संपते, तिचे अस्तित्व उरत नाही व तीच परत जन्मणे हे अशक्य. हे वचन कितपत बरोबर आहे ? उलट ह्याला विचारवंतांनी त्याज्यच ठरविले आहे. गीतेत याच्या बरोबर उलट " वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणी”.... म्हणजे आपण जुनी वस्त्रे टाकून देतो व नवी धारण करतो, त्याचप्रमाणे आपला आत्मा जुने जीर्ण शरीर टाकून नवे धारण करतो असे म्हटले आहे. आणि शेवटी मी कोण, आलो कोठून व जाणार आहे कोठे, असे प्रश्न आपणा सामान्य माणसांना पडत आहेत. आचार्य विनोबा भावे म्हणावयाचे, "मी रोज मरण पावतो व रोज जन्म घेतो. वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा रोज हजारो पेशी मरत असतात व तशाच नवीनही निर्माण होत असतात. कायम असतात त्या आठवणी - स्मृती. मेंदूतील या पेशी मेल्या की स्मृतीही संपतात. डिमेन्शिया व आल्झमायर ह्या रोगांत आपण पाहतो की शेवटी माणूस जिवंत असूनही मृतच असतो. मृत्यूबरोबर नाहीशी होते तो स्मृती, मन नव्हे.

  ज्याला आपल्या तत्त्वज्ञानात आत्मा म्हणतात व आधुनिक संशोधक 'विश्वव्यापी मन', ज्याचे स्वरूप कालातीत, सर्वव्यापी / वैश्विक व अतर्क्य आहे. हेच अंती सर्वांचे कारण आहे असे म्हणतात. पण मनाला सुद्धा तीन स्तर आहेत असे दिसते. याचा बाह्य स्तर, ज्याचा अभ्यास झाला आहे व ज्याला आपण मानसशास्त्र (Psychology) म्हणतो, ज्याला रोग होतात व त्यासाठी तज्ज्ञही (Psychiatrist) झाले आहेत, ते ज्ञान म्हणजे अगदी वरचा स्तर दुसरा स्तर येईल तो म्हणजे अंतर्मन (Sub-conscious) असे म्हणू. याला बाह्य स्तरासारखी जाणीव नसते, त्याचे अस्तित्व कळत नाही पण जे जागृत झाले तर अनेक सिद्धी प्राप्त होऊ शकतात, व त्याचे हार्द (Core, Non-local mind) म्हणजे आत्मा. ह्या मनाची शक्ती जागृत करण्याची रीत म्हणजे ( १ ) पातंजल योगाप्रमाणे ध्यानधारणा (२) भक्तिमार्ग (३) प्रार्थना. पातंजल योगसूत्राप्रमाणे ध्यानधारणा अतिशय अवघड आहे, मग कोणी याबद्दल काहीही म्हणोत. परंतु भक्तिमार्ग - प्रार्थना - नामस्मरण हे सोपे. याला जरुरी म्हणजे नीतिमत्ता व प्रार्थना संपूर्ण एकरूपतेने करावयाची, त्याच्याशी

१०६