पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/११०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वाटले व मी गेल्यावर माझ्याशी ते चर्चा करत बसले होते. त्या मित्रांची माझ्या उपचारपद्धतीवरील व ईश्वरावरील श्रद्धा यांचे हे यश होते, माझे नव्हे. मी फक्त निमित्तमात्र होतो.

  या वर्षी त्यांच्या पत्नीला गर्भाशयात फायब्रॉइड (Fibroid) झाल्याचे निदर्शनास आले. या गाठी साध्या किंवा कॅन्सरच्या असू शकतात. तेव्हा तपासणीत ही गाठ कॅन्सरची असल्याचे आढळून आल्याने मुंबईच्या एका प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करावयाचे ठरले. या सर्व गोष्टी माझे मित्र मला नियमितपणे कळवत होते. शस्त्रक्रियेची तारीख निश्चित झाल्यावर माझ्याकडून शस्त्रक्रियेपूर्वी व शस्त्रक्रियेनंतर घ्यावयास पाहिजेत ती औषधे मी लिहून दिली. शस्त्रक्रिया उत्तम झाली. परंतु लागण स्थिर (Localised) असल्याने केमोथेरपी नको असे ठरले. आणि त्यांना रेडिएशन देण्याचे डॉक्टरांनी ठरविले. आठवड्याला तीन याप्रमाणे एकूण पंचवीस वेळा बाह्यांगी व नंतर अंतरंगी पंधरा वेळा ही उपाययोजना ठरविली गेली. त्यांना रेडिएशन देण्यात येणार असल्याची माहीती मला त्यांच्या पतींनी दिलेली होती व त्याचा कमीत कमी त्रास व्हावा म्हणून काय औषधे द्यावीत हेही विचारले होते. त्याप्रमाणे त्यांनी ती सुरू केली. परंतु श्रद्धेने आणि प्रार्थनेने औषधांचा गुण खूप लवकर व उत्तम येतो हा माझा अनुभव. त्यामुळे मी ध्यानधारणा करावयास पूर्वी सांगावयाचो. परंतु त्याची पूर्वतयारी म्हणून यम-नियमांचे आचरण, आसन- प्राणायाम हे व्रत व शेवटी जमेल तेवढा प्रत्याहार अंगी बाणवणे हे झाल्याशिवाय ध्यानधारणेचा अत्यंत तात्पुरता परिणाम असतो हे मी नेहमीच सांगत आलो आहे व माझ्या लिखाणात ते वारंवार आलेले आहे. या ध्यानधारणेचे सोपे स्वरूप म्हणजे मनाने समरसून प्रार्थना करावयाची हे जास्त सोपे व उपयुक्त असा अनुभव येतो, हे मी पूर्वीच सांगितलेले आहे. या बाई हे सर्व श्रद्धापूर्वक पाळत होत्या. एका अर्थी हेही ध्यानच. परिणाम असा झाला की रेडिएशनचा त्यांना कणभरही त्रास झाला नाही. ही थेरपी देणाऱ्या टेक्निशिअन्सना अतिशय आश्चर्य वाटले. ते म्हणाले की आमच्या आयुष्यात अशी केस झालेली नाही. तुम्ही काय करत होता ? सुरुवातीस त्यांनी काहीच सांगितले नाही. कारण यावर लोकांचा विश्वास बसणे कठीण. पण नंतर तेथील प्रमुख डॉक्टरांनीच परत परत विचारल्यावर त्यांनी माझी औषधे घेत असल्याचे सांगितले. त्यांनाही आश्चर्य वाटले व त्यांनी मला भेटण्याची इच्छा

१०९