पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/११३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मानली गेली आहे. आईच मुलावर संस्कार करते, संगोपन करते. हे संस्कार मूल गर्भावस्थेत असल्यापासून घडू शकतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे अभिमन्यूचे म्हणून महाभारतात सांगितलेले आहे. गरोदर अवस्थेत भावी माता प्रसन्न राहिली पाहिजे, तिने उत्तम पोषक आहार घेतला पाहिजे, कारण हे झाले तरच मुलाचेही पोषण होणार. हीच गोष्ट मनाची आहे. आईचे मन जितके शांत, सद्विचारी व प्रेमळ असेल तेच गर्भावस्थेत सुद्धा व नंतर निश्चितच उत्तम संस्कार करू शकते. घरात वातावरणच जर वाईट असेल तर त्याचा परिणाम मुलांवर निश्चितच होतो. चांगले संस्कार झालेली मुले ही शारीरिक व मानसिक दृष्ट्या निरोगी व विचारी होतात. पुढे मुले मोठी झाली की आईबापांनी मी तुझ्यासाठी एवढे केले तर तुझेही आमच्या विषयी काही कर्तव्य आहे, असे म्हणणे म्हणजे ते प्रेम कधीच निरपेक्ष नव्हते असे म्हणता येईल. चांगले संस्कार झालेली मुले व विचारी आईबाप यांच्यांत कधीच वैचारिक दरी पडू शकत नाही, कारण ते एकमेकांना समजावून घेऊ शकतात व काही गोष्टीत मतभेद झाले तरी त्यामुळे त्यांच्या संबंधांत फरक पडत नाही. हीच उन्नत मनाची खूणगाठ. अशा प्रेमाचा किंवा मायेचा विकारमुक्तीशी काही संबंध आहे का? आजच्या आधुनिक काळात प्रेम आणि मायेने केलेली शुश्रूषा रुग्णाला लवकर बरा करण्यास उपयोगी पडते का? पडत असेल तर त्याचे प्रमाण किती आणि अशी मनाची उन्नत अवस्था प्रेमातून साध्य होते का? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. प्राचीन आणि अर्वाचीन काळात संशोधन आणि प्रत्यक्ष अनुभव काय आले व येतात हे पाहणेच हा दावा बरोबर का चूक हे ठरवू शकेल.

  खरे प्रेम व माया असेल तर शुश्रूषासुद्धा सफल होऊ शकते. आज शुश्रूषा ही प्रक्रिया, हे एक कौशल्याचे तंत्र झाले आहे. हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या नर्सेस, आया किंबहुना वॉर्डबॉईजच्या कर्तव्याचे अत्यंत आधुनिक तंत्र निर्माण झाले आहे. नर्सिंग ह्या विषयाची फ्लॉरेन्स नाईटिंगल ही जननी समजली जाते. तिच्या काळात आज आपण ज्याला नर्सिंगचे कौशल्य म्हणतो तो स्तर निश्चितच नव्हता. परंतु सेवा आणि प्रेम ही अतूट जोडी आहे हे तिने दाखवून दिले. आज काही अपवाद सोडता काय दृश्य दिसते? रुग्णाचे स्पॉजिंग करणे, वेळेवर औषधे देणे, रुग्णाच्या अवस्थेची उत्तम नोंद ठेवणे, ही कामे तांत्रिक दृष्ट्या उच्च दर्जाची दिली जातात असे गृहीत धरले जाते. शल्यकर्मानंतरही जरूर ती सेवा दिली जाते असेच गृहीत

११२