पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/११४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

धरले जाते. परंतु सत्य परिस्थिती असे दर्शवते की नर्सेसच्या मध्ये तीन प्रकार आढळतात. (१) निष्काळजी, सेवा आवडत नसल्यामुळे आदळआपट, रुग्णांशी नीट संवाद न साधणे वगैरे. यामुळे ते रुग्णसुद्धा मनाने नाराज असतात व काही जण खचतातही. यांना नर्स म्हणणे हा नाईटिंगेलच्या सेवाधर्माचा अपमान आहे. (२) दुसऱ्या प्रकारात सर्व तांत्रिक जबाबदाऱ्या उत्तम पण यंत्रवत संभाळणाऱ्या, पण त्यात मायेचा अभाव असतो. आजच्या युगातील ह्या जबाबदार, कर्तव्यदक्ष नर्सेस समजल्या जातात. (३) अत्यंत अपवादात्मक अशा सेवाधर्म केवळ कर्तव्य म्हणून न समजता आपलेपणाने, मायेने पार पाडणाऱ्या. अशा नर्सेस रुग्णांना हव्या हव्याशा वाटतात, त्यांचा मानसिक आधार असतो. या खऱ्या नाईटिंगेलच्या वारस म्हणावयास हरकत नाही. असेच प्रकार डॉक्टर्समध्येही आढळतात. अर्थात डॉक्टर्स काय किंवा नर्सेस काय त्यांच्या विषयांतील समाजाची ही प्रतीके आहेत. यामुळेच अनेक हॉस्पिटल्स खऱ्या अर्थाने सेवाभावी नाहीत, आणि केवळ नाइलाज म्हणून रुग्ण तेथे जात असतात. वैद्यक तंत्र हे निश्चितच जरूर आहे. परंतु त्याबरोबर जर मायेची जोड त्याला मिळाली तर यशाचे प्रमाण निश्चित वाढेल. यासाठीच मनाचा खोलवर अभ्यास हवा. अनेक अधिकारी व्यक्तींनी याला अनुसरून लिखाण केलेले आहे.

  पूर्वी डॉक्टर्स कमी होते. वैद्यकशास्त्र आजच्या इतके प्रगल्भ झालेले नव्हते.. ( हे आधुनिक वैद्यकशास्त्राला पूर्णतः लागू आहे.) आजच्या सारखी गल्लोगल्ली हॉस्पिटल्ससुद्धा नव्हती. आज नेहमी बोलताना विशेषतः आरोग्यसेवेबद्दल बोलताना आपली तुलना पुढारलेल्या राष्ट्रांशी केली जाते. अमेरिकेत अमुक लोकसंख्येमागे एक डॉक्टर आहे. अमुक लोकसंख्येमागे एक इतकी हॉस्पिटल्स आहेत, तर आपल्याकडे इतकी आहेत. मुळात ही तुलनाच अस्थानी आहे. विकारग्रस्तता व हॉस्पिटल्स याऐवजी आरोग्य आणि सेवा यांची तुलना व्हावी. मग ते चित्र वेगळे दिसेल. ही तुलना निर्विवाद सत्य असली तरी अमेरिकेतील वैद्यक व्यवसाय माणुसकीचे निकष लावून किती श्रेष्ठ आहे हा शोध पूर्णत: कोणी घेतलेला दिसत नाही. मायेने सेवा मिळणे सोडाच, परंतु कायद्याला भिऊन नको त्या व नको इतक्या वेळा निरनिराळ्या तपासण्या, यांत्रिक सेवा घेऊन व स्वतःची बुद्धी न वापरता घेतले जाणारे निष्कर्ष, अशा अनंत गोष्टी वैद्यक व्यवसायाला थोरवी देऊ शकत नाहीत. याचा अर्थ एकच - भौतिक प्रगती वेगाने होत आहे व जणू त्याचे

११३