पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/११६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

(हे फारच अल्प आढळले) त्या स्पर्शस्थानी खूप गारवा जाणवतो. असे समजले जाते की या प्रकारात तो सिद्ध प्रत्यक्ष स्पर्शाने ही शक्ती रुग्णास देत असतो. असे पुरुष आजही असल्याचे डॉ. लोशान लिहितो. पण हे नेहमीच यशस्वी होत नाही.
 आपल्याला हा प्रकार हजारो वर्षांपासून माहीत आहे. साधु-संत, ऋषि-मुनी मस्तकावर हात ठेवून आशीर्वाद देत व तो खरा ठरत असे. ही सर्व मंडळी अध्यात्माशी एकरूप झालेली होती हे स्पष्ट आहे. डॉ. लीशान यांना हस्तस्पर्शाने विकारमुक्ती हमखास व नेहमी होते असे वाटत नाही. ते म्हणतात की, ही कधी कधी घडणारी गोष्ट आहे. यामागची कारणपरंपरा मात्र त्यांनी लिहून ठेवलेली नाही. बहुधा त्यांना त्याची जाणही नसावी. येथे आपणास भारतीय तत्त्वज्ञानातच याचा शोध घ्यावा लागतो. ही सिद्धी केव्हा प्राप्त होते? त्याचे उत्तर विकारमुक्ती करणाऱ्या व्यक्तीची नैतिक उंची व मानसिक शक्ती या उच्च दर्जाच्या असणे अत्यंत अगत्याचे आहे. यामागे तपश्चर्या असते, साधना असते. ही साधना म्हणजे प्रयत्न व जाणीवपूर्वक आत्म्याशी एकरूप होणे. याचे आपण थोडेसे दर्शन घेऊ. योगशास्त्राला दर्शन म्हटले जाते. पण आपल्याला चित्ताच्या ह्या उन्नत अवस्थेचा अनुभव येत नाही, कारण आपली तेवढी साधना झालेली नसते. पातंजल योगदर्शन हा एक 'ह्यासम हाचि' असा ग्रंथ आहे. याचा अभ्यास म्हणजे अध्यात्माची वाटचाल. आपणा सामान्य माणसांची दृष्टी शरीरापलीकडे जाऊ शकत नाही. पतंजली अवघ्या १९५ सूत्रांत आपणाला योगमार्गाचे विश्वरूप दर्शन घडवून आणतात. आपली दृष्टी प्रथमतः देहावर केंद्रित असते. यामुळेच पतंजलींनी अध्यात्माच्या इतर पैलूंप्रमाणेच अष्टांगयोगावर भर दिला आहे. यातच त्यांनी हळूहळू देह, मग मन व अंती कैवल्य- प्राप्ती असा पायऱ्या पायऱ्यांचा मार्ग सांगितला आहे.

  पतंजलींनी या ग्रंथाचे चार पाद सांगितले आहेत. पहिला पाद समाधिपाद व त्यानंतर साधनपाद येतो. समाधी हे अंतिम साध्य आहे तर आधी साधनपाद यावयास पाहिजे. कारण साधनाद्वाराच साध्य प्राप्त होत असते. वाचस्पती मिश्र किंवा इतर टीकाकारांच्या टीकेवरून असे दिसते की समाधी हे अंतिम साध्य, त्यासाठी साधने काय? मार्ग काय? हे नंतर विचारात घ्यावयाचे. समाधिपाद हा ज्यांचे समाहीत चित्त आहे म्हणजे ज्यांचे चित्त अंतर्मुख, एकाग्र, स्थिर व समतोल आहे, त्यांचेसाठी आहे. याउलट व्युत्थितचित्त. व्युत्थितचित्त म्हणजे जो स्वतः च्या अंतरंगापासून

११५