पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/११७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खूप दूर गेला आहे व जो बहिर्मुख जीवन जगण्यात आनंद मानतो असा मानव. आधुनिक कालखंडच आपण पाहूया. विसाव्या शतकातील जीवनशैलीवर एक दृष्टिक्षेप टाकला तर व्युत्थितचित्त म्हणजे काय हे सहज समजू शकते. विज्ञान आणि तंत्रज्ञानात जी अफाट प्रगती झाली ती फक्त भौतिक जीवनाची. प्रत्येक गोष्ट स्वसुखासाठी पाहिजे. ते जर सहजासहजी मिळणार नसेल तर ते ओरबाडून घेण्याची वृत्ती फोफावली. खाणे-पिणे, शरीरसुख, मनोरंजनाची साधने ही सर्व आपले व्युत्थित चित्ताची खाली खाली जाणारी स्थिती दर्शवते. सुखाच्या ओढीबरोबर भयगंडही वाढीस लागला. सुखे उपभोगून त्यांची तृष्णा शांत होत नाही तर ती आणखीनच वाढते, अशा अर्थी एक संस्कृत सुभाषित आहे. जिभेचे चोचले पुरविण्यासाठी रोज नवनवीन पदार्थ घरीदारी व बाजारी आले. श्रम नाहीसे करण्यासाठी निरनिराळी यांत्रिक साधने आली. विषयसुखाची ओढ तारुण्यात असणे हे नैसर्गिक आहे व आपल्या आयुष्याच्या जोडीबरोबर ते सुख घेणे अध्यात्माला वर्ज्य नाही. परंतु त्यातही नित्य बदल हवासा वाटू लागला व लैंगिक विकारांचे प्रमाण फोफावले. वयोमानानुसार ही ओढ कमी होणे, संबंधित इंद्रियांचा शक्तिऱ्हास होणे हे नैसर्गिक. पण औषधे घेऊन, गेंड्याच्या शिंगाचे कप, वाघ, सिंह यांची चरबी वापरून कोणीकडून ही ओढ व शक्ती कायम टिकविण्याचे मार्ग शोधले गेले. पण शेवटी 'करावे तसे भरावे' या नियमानुसार या मार्गाची किंमतही निरनिराळ्या स्वरूपात फेडावी लागतेच. हेच केल्या कर्माचे फळ. हीच मनाची व्युत्थित अवस्था.

 या अवस्थेतून बाहेर पडून समाहीत अशी चित्ताची स्थिती मिळवणे म्हणजेच एका अर्थी समाधी. यासाठीच योगसाधनेची जरूर. यामुळे या पृथ्वीवरील आपला निवास सुखकारक, हितकारक आणि आरोग्यदायी होईल. यासाठीच अष्टांगयोगाची जरुरी आहे. यात यम, नियम, आसन, प्राणायाम या बहिरंगाची साधना करून त्यामार्गे प्रत्याहार प्राप्त करता येतो. यानेच चित्त अंतर्मुख, एकाग्र, स्थिर व समतोल बनते. आपलेकडे असे अनेक साधु-संत व सिद्धपुरुष होऊन गेले. 'सिंग' नावाचे एक सिद्धपुरुष होते, ते हस्तस्पर्शाने विकार बरे करत असत. त्या काळात मध्य प्रांताचे गव्हर्नरांची पत्नी संधिवाताने आजारी होती, तिला चालताही येत नव्हते. ती या सिद्ध पुरुषाच्या हस्तस्पर्शाने बरी झाली. येशू ख्रिस्त स्पर्शाने अगदी महारोगसुद्धा बरा करत असे. डॉ. मिकाओ उसुई हे ख्रिश्चन धर्मगुरू होते, त्यांनी

११६