पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/११८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

या शक्तीचा शोध घेण्याचे ठरवले. ते शिकागो विद्यापीठात दाखल झाले. तेथे त्यांनी थिऑलॉजीमध्ये डॉक्टरेट मिळवली. परंतु ख्रिश्चन धर्मवाङ्मयामध्ये त्यांच्या समस्या सोडविणारे काही मिळाले नाही. तेथून ते चीनला गेले तेथेही समाधान न झाल्याने शेवटी भारतात येऊन त्यांनी भारतीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला व बौद्धदर्शनात त्यांना काही मार्ग सापडले. पुढे त्यांनी 'कुरियामा' नावाच्या पर्वतावर जाऊन एकांतात २१ दिवस उपोषण केले आणि त्यांना त्या दिवशी साक्षात्कार झाला तो एका प्रकाशलोळाने. यातून त्यांना जी शक्ती मिळाली ती स्पर्शाने विकार नाहीसा करण्याची. याचा पहिला अनुभव त्यांना स्वतःलाच आला. त्यांना लागलेली ठेच व वाहणारे रक्त हात लावताच बरे झाले. याचेच नाव रेकी.
 भारतीय तत्त्वज्ञानात जे अनेक मार्ग सांगितले आहेत त्यांत योगसाधना, विपश्यना आदी साधना, उपवास, भक्तिमार्ग या सर्वांचे सहज दर्शन घडते. डॉ. उसुईंनी संस्कृतचा व तत्त्वज्ञानाचाही अभ्यास केला होता असे दिसते. त्यांना ही सिद्धी एकूण बारा वर्षे अभ्यास व साधना याद्वारे प्राप्त झाली 'कुरियामा' पर्वतावरील २१ दिवस उपोषण, ध्यानसूत्रांचे पाठांतर ही एकूण तपश्चर्येची शेवटची पायरी असावी. आज 'रेकी'चे स्वरूप संपूर्ण व्यापारी झाले आहे. पंधरा दिवस, एकवीस दिवस अशा नगण्य कालखंडात ही शक्ती प्राप्त होते असे म्हणणे हास्यास्पद आहे. प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला वर्षानुवर्षे तपश्चर्या केल्याशिवाय ज्ञानप्राप्ती होत नाही. आणि या गोष्टी जर इतक्या सोप्या असत्या तर वैद्यकशास्त्राची जरुरीच राहिली नसती व प्रत्येक जण काही फी देऊन रेकीतज्ज्ञ झाला असता. सत्य असे आहे की प्राचीन कालातील आशीर्वादाने कल्याण करणारे ऋषि-मुनी, जैन धर्माचे तीर्थंकर (वर्धमान महावीर हे जैन धर्माचे चोविसावे व शेवटचे तीर्थंकर समजले जातात), गौतम बुद्ध तथा बोधीसत्त्व, येशू ख्रिस्त अशी आदरणीय, त्यागी, मानवसमाजाचे खरेखुरे कल्याण चिंतणाऱ्या विभूती शेकडो वर्षांत एखादीच निर्माण होते. सिद्धपुरुषही लाखो लोकांत एखादाच असतो. गल्लोगल्ली रेकी देणारे लोक रेकीचे नाटक करून पैसे मिळवत असतात. त्यांनी शंभर रुग्णांवर तज्ज्ञांच्या देखरेखीखाली उपचार करून ते रुग्ण बरे करून दाखवावेत.

 सत्य असे आहे की आपण सामान्य माणसे आहोत. आपल्या शक्ती अतिशय सीमित आहेत. तेव्हा जमेल त्यांनी योगसाधना, तीही जमत नसल्यास भक्तिमार्ग,

११७