पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१२०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

फ्रान्समधील 'लूर्डस्' हे गावही असे क्षेत्र झालेले आहे. ब्रेंडन ओरेगन हा कालिफोर्नियातील सोसालिटो येथील संशोधन संस्थेचा व्हाइस प्रेसिडेंड आहे. तो मेड्जुगोरजे येथे या संबंधात संशोधनासाठी गेला. तो मान्य करतो की जे रुग्ण येथे येऊन बरे होतात त्यांचा मानसिक ढाचा एका वेगळ्याच स्वरूपाचा असतो. तो म्हणतो, “हे लोक मानसिक, भावनिक व मनोकायिक अशा एका वेगळ्याच स्तरावर असतात. त्यांची दृष्टी कोठल्यातरी अतिदूर क्षेत्रात वावरत असते. त्यांना भोवतालच्या वातावरणाचे जणू भानच नसते. त्या दृष्टीत असा काही भाव असतो की त्यात कशाची तरी तळमळ आहे, काही आठवण्याचा ते प्रयत्न करत आहेत व त्यांना सर्वांगीण प्रेमाची - मायेची ओढ लागली आहे. " ओरेगनने लूर्डस्, मेड्जुगोरजे व इतरत्र अशा चमत्काराने बऱ्या झालेल्या लोकांच्या हकीकती तपासून पाहिल्या. या संकल्पित कार्यासाठी या संस्थेने ८६० वैद्यकीय मासिके आणि ३००० वर वैयक्तिक लेख असे या विषयावर प्रसिद्ध झालेले वाङ्मय खोलवर तपासले आहे. हा रिपोर्ट म्हणजे जगातील सर्वात मोठा रिपोर्ट असेल. ह्या रिपोर्टाचा मथळा 'रेमिशन विथ नोॲलोपॅथिक इंटरव्हेन्शन' (Remission with no Allopathic intervention) म्हणजेच 'ॲलोपॅथीच्या कसल्याही मध्यस्थीशिवाय (मदतीशिवाय ) रोगमुक्ती' (पूर्णक्षमा). ह्या रिपोर्टमुळे 'चमत्कारांनी रोगमुक्ती' ह्या शास्त्रात न बसणाऱ्या गोष्टीला जणू जगन्मान्यताच मिळाली.

 कदाचित आपण सामान्य माणसे व विज्ञानवादी लोक यावर चटकन विश्वास ठेवणार नाही व त्याला अंधश्रद्धा, भास अशा संज्ञांद्वारे असे लोक संबोधतील. परंतु एक अत्यंत अशक्य वाटणारी, वैद्यकशास्त्राच्या पूर्ण डोक्यावरून गेलेली, व त्या विषयात मान्यवर विद्वानही चकित झालेली सत्य घटनाच पाहू. पुढील घटनेची सविस्तर हकीकत ‘मेडिकल कमिशन लूर्डस् - फ्रान्स' यांनी दिली आहे. व्हिट्टोरिओ, मायकेली हा एक मध्यमवयीन इटालिअन नागरिक. १९६२ साली याला व्हेरोना येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करून घेण्यात आले. मायकेली याच्या डाव्या कुल्ल्यावर एक गोळा आलेला होता. हा गोळा एवढा मोठा होता की मायकेलीला नेहमीच्या हालचाली करणे जवळजवळ अशक्य झाले होते, व त्याला आत्यंतिक वेदना होत होत्या. एक्स रे काढल्यावर असे आढळून आले की त्याची कंबर व बैठकीच्या हाडांची अतिशय झीज झालेली होती व जणू हा रोग त्याची

११९