पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१२३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जी प्रदीर्घ तपश्चर्या, पूर्णार्थाने श्रद्धा ह्या गोष्टी आपणा सामान्य माणसांना शक्य होत नाहीत. पतंजली ऋषी योगसूत्रे सांगणारे व आयुर्वेदाचे उत्तम ज्ञान असलेले निरनिराळ्या संहितांवर टीका सांगणारे असे होते. त्यांनाही अध्यात्म व वैद्यकशास्त्र ही एकमेकास पूरक आहेत हे माहीत होते, असा निष्कर्ष सहज काढता येतो. आयुर्वेद तसा दोन-अडीच हजार वर्षांपूर्वीचा परंतु आधुनिक वैद्यकशास्त्रात नसलेला एक श्रेष्ठ विचार त्यात आढळतो. “प्रत्येक व्यक्ती ही स्वतंत्र प्रकृतीची आहे. वात, पित्त व कफ या तीन दोषांत तिचे अस्तित्व असते. तेव्हा त्या प्रकृतीला पोषकच आहार व औषधोपचार यांची जरुरी असते. हीच गोष्ट मनाचीही आहे. वात, पित्त व कफ यांतील प्रकृतिदोषानुसार त्यांचे मानससुद्धा वेगळे असते." यांचा संगम आयुर्वेदात आहे. (परिशिष्ट पाहा)
 मनसुद्धा त्रिगुणी आहे. सात्त्विक, राजसिक व तामसी प्रेम, श्रद्धा, प्रार्थना यामुळे मिळणारे फायदेही वेगवेगळे असणारच. सात्त्विक प्रवृत्तीच्या लोकांना आध्यात्मिक जोडामुळे उत्तम गुण येत असणार. यापेक्षा राजसिक लोकांना कमी व तामसी लोकांना तर असे अनुभव येणे शक्य वाटत नाही. तेव्हा प्रत्येक व्यक्तीने प्रथम सात्त्विक होण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून प्रयत्न केले पाहिजेत. तर त्याचा फायदा निरामय जीवन घडविण्यात होईल. डॉ. साल्क यांना पडलेल्या प्रश्नाचे उत्तर यात सापडू शकते. व्हिट्टोरियो हा पूर्णपणे सात्त्विक प्रकृतीचा असला पाहिजे. नाहीतर लूर्डस्ला जाऊन काहीही गुण न आलेले लोक कमी नाहीत. लूर्डस्चे पाणी अत्यंत पवित्र समजले जाते. पण त्यात स्नान करणारी व्यक्ती जर पवित्र मनाची नसेल तर मन व ते पवित्र पाणी यांचा संगम होणे कठीणच ठरेल. सर्व पवित्र क्षेत्रांविषयी तेथे काही उच्च अनुभव येण्यासाठी प्रथम आपले मन पवित्र असणे अत्यंत अगत्याचे असते हेच या सर्वांचे सार आहे. पण यामुळे वैज्ञानिक मार्गाने उत्तर शोधणे अतिशय अवघड आहे.

१२२