पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/१२५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 आधुनिक वैद्यकशास्त्र म्हणजे काय,त्याच्या मर्यादा किती याचा थोडासा ऊहापोह आपण करून पाहू.प्रशिक्षित आधुनिक वैद्यकशास्त्रातील तज्ज्ञ बहुधा त्या शास्त्राविषयी नको एवढी श्रद्धा किंबहुना त्याखेरीज इतर उपचारपद्धतीच नाहीत असा दावा करतात.आयुर्वेदाला भविष्य नाही, होमिओपॅथीतील औषधे, औषधे नव्हतेच असे म्हणणारे विद्वान मला माहीत आहेत.परंतु हे आधुनिक वैद्यकशास्त्र जेथून आले त्या पाश्चात्य राष्ट्रांतील अनेक या विषयातील व या पद्धतीतील उणिवांचा विचार करू लागले आहेत.त्यातूनच 'होलिस्टिक' उपाययोजनेची संकल्पना जन्मास आली.आज तर असे आढळते की पाश्चात्य तज्ज्ञांनी काही नवीन संकल्पना मांडल्या,सुंदर सुंदर शब्दांमध्ये ग्रंथनिर्मिती केली की वाहून जाऊन आम्हीही त्याची नक्कल करू लागतो.परंतु पाश्चात्यांची, नवीन गोष्टी वैज्ञानिक स्तरावर तपासून त्या आधुनिक संकल्पनेच्या विरुद्ध असल्या तरी त्याची स्वीकृती करावयाची असे स्वच्छ मन जपण्याची वृत्ती निश्चित अनुकरणीय आहे.त्यांचा चंगळवाद,पैसा हाच परमेश्वर मानण्याची व आपल्या सुखासाठी कशाचाही बळी देण्याची,सुख ओरबाडून घेण्याची आसुरी वृत्ती मात्र आपलेकडे आली. कालानुसार जीवनात बदल होतात, त्यात वावगे काही नाही. परंतु उन्नत मनाची, माणुसकीची जी परंपरा बऱ्याच प्रमाणात आपलेकडे होती ती मात्र नष्ट होत चालली आहे.अंधानुकरण व मानसिक गुलामगिरी अंगीकारणे व त्याची खंतही नसणे हे महापाप म्हणावयास हरकत नाही. ओघाने आले म्हणून हे कटू सत्य सांगावे लागते.
 वैद्यक म्हणजे एखादी व्यक्ती आजारी का पडते व तो आजार दूर कसा करता येईल हे जाणण्याचे शास्त्र अशी त्याची व्याख्या करता येईल. याचा सर्व भर शरीराचे अणू यावर दिला जातो.याला उपमा द्यावयाची झाली तर एखादा पदार्थ विज्ञान- शास्त्रज्ञ (Physicist) जसे 'क्वार्क' या मूलभूत अणूवरच लक्ष केंद्रित करतो तसाच वैद्यकशास्त्रज्ञ देहाच्या अणूवर लक्ष देतो. या अणूमध्ये बदल झाला की शरीरस्वस्थता नष्ट होऊन शरीराच्या निरोगी कार्यात अडथळे निर्माण होतात. यालाच आपण शारीरिक रोग म्हणतो. आधुनिक वैद्यक म्हणजे शरीराचे अणू नियमान्वये का वागत नाहीत, हे का होत आहे याची कारणपरंपरा शोधून काढणे (Molecular theory of disease causation) म्हणजे सामान्य भाषेत रोगाची निर्मिती का झाली याची कारणपरंपरा शोधणे. आपले याचे ज्ञान जर खरेच परिपूर्ण असेल तर १२४